मुंबईत 'टीपी-लिंक'च्या 'इनक्यूबेशन सेंटर'चे उदघाटन, मंत्री मंगलप्रभात लोढांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2025 16:54 IST2025-07-08T16:52:53+5:302025-07-08T16:54:16+5:30

वायफाय आणि सीसीटीव्ही कॅमेरा उपकरणांमध्ये देशातील आघाडीची कंपनी असलेल्या टीपी-लिंक इंडियानं आज देशातील इनक्ब्यूबेशन सेंटरचे उद्घाटन केले.

Inauguration of TP Links first Incubation Center in Mumbai presence of Minister Mangal Prabhat Lodha | मुंबईत 'टीपी-लिंक'च्या 'इनक्यूबेशन सेंटर'चे उदघाटन, मंत्री मंगलप्रभात लोढांची उपस्थिती

मुंबईत 'टीपी-लिंक'च्या 'इनक्यूबेशन सेंटर'चे उदघाटन, मंत्री मंगलप्रभात लोढांची उपस्थिती

मुंबई

वायफाय आणि सीसीटीव्ही कॅमेरा उपकरणांमध्ये देशातील आघाडीची कंपनी असलेल्या टीपी-लिंक इंडियानं आज देशातील इनक्ब्यूबेशन सेंटरचे उद्घाटन केले. जे मुंबईतील अंधेरी परिसरात कंपनीच्या मुख्यालयाच्या जवळच आहे. राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या सेंटरचे उदघाटन करण्यात आले. 

तरुणाईतील नावीन्यपर्णतेला चालना देण्यासाठी आणि भागीदारांना देण्यात येणारे प्रशिक्षण अधिक सुलक्ष होण्यासाठी या इनक्यूबेशन सेंटरचा उपयोग होणार आहे. भारत-प्रथम दृष्टिकोन आणखी मजबूत करून, टीपी-लिंक बेंगळुरूमध्ये संशोधन आणि विकासासाठी एक अत्याधुनिक ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (जीसीसी) देखील येत्या काही आठवड्यात सुरू करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

भारत केंद्रित विकास योजनेचा एक भाग म्हणून, पुढील वर्षभरात आणखी २० सेवा केंद्रे स्थापन करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून विशेषतः टिअर २ आणि टिअर ३ शहरांमध्ये आपले सेवा केंद्र नेटवर्क वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे.  याव्यतिरिक्त, वाढत्या ऑपरेशन्स आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी टीपी-लिंक इंडिया पुढील वर्षी त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांनी वाढवण्याच्या विचारात आहे. 

तरुणांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढच्या पिढीतील कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानामध्ये विविध उपक्रमांना चालना देणे हा या नवीन इनक्युबेशन सेंटरचा उद्देश आहे. हे सेंटर भारतातील विद्यार्थी, विकासक आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच त्यांचे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी साधने, कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्क उपलब्ध होईल यासाठी टीपी-लिंक कंपनी पूर्ण मदत करणार आहे. 

संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन
टीपी-लिंकने सुरू केलेल्या या उपक्रमाचं मंत्री लोढा यांनी कौतुक केले. "मुंबईतील नवीन मुख्यालयात विद्यार्थ्यांसाठी इनक्यूबेशन सेंटर लाँच करून टीपी-लिंक इंडिया संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देत आहे हे पाहून खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांना या इनक्यूबेशन सेंटरचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने डिजिटल भारत निर्माण करण्यास मदत होईल, अशी आशा आम्हाला आहे," असे मंगल प्रभात लोढा म्हणाले.

तरुणाला सक्षम करणे हेच विकासाचे द्योतक
भावी पिढीला सक्षम बनवणे ही शाश्वत विकास आणि सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, यावर आमचा विश्वास असल्याचं टीपी-लिंक इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक संजय सहगल म्हणाले. यासोबतच या केंद्रात गुंतवणूक करून, आम्ही सर्जनशीलता, सहकार्य आणि धाडसी विचारपूर्वक चालणाऱ्या भविष्यात गुंतवणूक करत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. 

इनक्युबेशनची क्षमता किती?
टीपी-लिंक इंडियाचे मुंबईतील हे नवे केंद्र २०,००० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले असून, येथे सध्या १५० पेक्षा जास्त आसन क्षमता आहे. तसेच देशातील १० शहरांमध्ये टीपी-लिंक इंडियाची कार्यालये आहेत.

Web Title: Inauguration of TP Links first Incubation Center in Mumbai presence of Minister Mangal Prabhat Lodha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.