Join us  

आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकवर्ग अपुरा; विद्यार्थ्यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 4:45 AM

निदेशकांची २,३६१ पदे रिक्त

मुंबई : केंद्र सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. त्यासाठी औद्योगिक जगताला कौशल्यप्राप्त कामगारांची गरज आहे. हे काम आयटीआयमधून होणे अपेक्षित आहे. मात्र, या संस्थांमध्ये कौशल्य प्रशिक्षकाची (निदेशक) राज्यात सुमारे २,३६१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षकवर्ग अपुरा असल्याची खंत विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत कार्यरत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंजूर ६ हजार ३२४ पदांपैकी ३ हजार ९६३ पदे भरली असून २ हजार ३६१ पदे अद्याप रिक्त असल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. याचा परिणाम व्यवसाय शिक्षणावर जाणवू लागला असून यंदा मागील वर्षीपेक्षा प्रवेशाचे प्रमाण कमी झाल्याचेही समोर आले आहे. कौशल्य विकासातून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयटीआयच्या विस्तारीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

‘तालुका तेथे आयटीआय’ ही संकल्पनाही अंमलात आली; पण संख्यात्मक वाढ करताना गुणात्मक वाढीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, आयटीआयमध्ये निदेशकांची कमतरता जाणवू लागल्याचे चित्र आहे. कौशल्य विकासअंतर्गत राज्यात अजून आयटीआय सुरू करण्यात येणार आहेत. दहावीनंतर आयटीआय करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना बारावी उत्तीर्णतेचा दर्जा मिळणार आहे. राज्यभर खासगी कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ आयटीआयमधून उपलब्ध होत असते. व्यवसाय प्रशिक्षणासाठी विविध शाखा उपलब्ध आहेत.

आयटीआयमधून योग्य प्रशिक्षण मिळाले नाही, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. याचा परिणामही यंत्रणेवर होत आहे. अतिरिक्त संस्थांचा कारभार सांभाळताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. योग्य प्रशिक्षण मिळाले नाही, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

नुकतेच शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. कौशल्य विकासासाठी नवे धोरण स्वीकारण्यात आले आहे. व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट सरकारने समोर ठेवले आहे. निदेशकाची रिक्त राहिलेली पदे भरण्यासाठी आता रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात तरी आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींसाठी पुरेसा शिक्षक वर्ग उपलब्ध होईल, अशी अपेक्षा प्रशिक्षणार्थींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :आयटीआय कॉलेजशिक्षक