नववर्षात ‘पूल’ जा सिम सिम... मुंबईकरांसाठी खुले होणार चार फ्लायओव्हर

By जयंत होवाळ | Published: January 1, 2024 09:34 AM2024-01-01T09:34:38+5:302024-01-01T09:36:31+5:30

कोस्टल रोडही येणार सेवेत.

In this new year these four flyovers to be opened for mumbaikars | नववर्षात ‘पूल’ जा सिम सिम... मुंबईकरांसाठी खुले होणार चार फ्लायओव्हर

नववर्षात ‘पूल’ जा सिम सिम... मुंबईकरांसाठी खुले होणार चार फ्लायओव्हर

जयंत होवाळ, मुंबई : महापालिकेने हाती घेतलेल्या काही महत्त्वांच्या प्रकल्पांपैकी चार मोठे प्रकल्प नवीन वर्षात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय त्यांचा प्रवासही  वेगवान होईल. विक्रोळी पूर्व-पश्चिम रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार पूर्व-पश्चिम रेल्वे उड्डाणपूल पूल, गोखले पूल, कर्नाक पूल या चार महत्त्वाच्या उड्डाणपुलाची कामेही नव्या वर्षात मार्गी लागून हे पूल वाहतुकीसाठी खुले होतील. मरिन ड्राइव्ह हा भाग क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखला जातो. कोस्टल रोडच्या रूपात आणखी एका नेकलेसमुळे  मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल.

 कोस्टल रोडमुळे पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी बऱ्यापैकी कमी होईल, अशी अपेक्षा आहे. या मार्गामुळे चार ठिकाणी पार्किंग उपलब्ध होणार असून त्या ठिकाणी १,८०० वाहने सामावली जाऊ शकतात. पार्किंग भूमिगत असणार आहे. प्रकल्पाअंतर्गत ७० टक्के हरितक्षेत्र निर्माण होणार असल्याने प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल.

कोस्टल रोड :

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वरळी सी लिंकच्या टोकापर्यंत पसरलेल्या या प्रकल्पाचे  त्यासाठी तब्बल १३ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च आहे. 

७.४७ किमी लांबीची सागरी तटरक्षक भिंत आणि दुहेरी बोगदे हे या मार्गाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. लाटांचा मारा थोपवण्यासाठी नेहमीप्रमाणे टेट्रापॅड न टाकता बेसॉल्टच्या खडकांचा वापर करण्यात आला आहे. 

या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत  ७० टक्के, तर इंधनात ३४ टक्के बचत होईल. मरीन ड्राइव्ह ते वरळी हे अंतर फक्त आठ मिनिटात कापता येईल.  या मार्गात प्रत्येकी चार या प्रमाणे आठ मार्गिका असतील. 

गोखले पूल : 

  अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम पूर्ण न झाल्याने गेली वर्षभर अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. 

  या पुलासाठी रेल्वे मार्गावर गर्डर  टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होईल. संपूर्ण पूल पावसाळ्यापूर्वी सुरू होईल. 

  अंधेरी रेल्वे स्थानकाशेजारील गोपाळकृष्ण गोखले पुलाची पादचारी मार्गिका २०१८ सालच्या जुलै महिन्यात कोसळून जीवितहानी झाली होती. त्यानंतर हा पूल पाडून नवीन पूल बांधण्याची योजना आखण्यात आली.

विद्याविहार पूर्व- पश्चिम रेल्वे उड्डाणपूल:

  २०१६ साली या पुलाचा आराखडा तयार झाला. पुलाचे बांधकाम २०२२ साली पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, रेल्वेने आराखड्यात अनेक बदल सुचवल्याने कामाचा व्याप वाढला. गर्डरला रुळांच्या मधोमध आधार न ठेवता, विनाखांब एकसंधपणे त्याची उभारणी केली जात आहे. 

  हा अभियांत्रिकी  क्षेत्रातील आविष्कार मानला जातो. पुलासाठी  १७८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या पुलामुळे घाटकोपर परिसरात पूर्वेकडील रामकृष्ण चेंबूरकर, पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग जोडले जाणार आहेत. 

विक्रोळी पूर्व- पश्चिम  रेल्वे  उड्डाणपूल : 

  विक्रोळी रेल्वे मार्गावरून  जाणाऱ्या आणि त्यायोगे पूर्व आणि पश्चिम भाग जोडणाऱ्या या पुलाचे काम २०१४ साली सुरू झाले होते. 

  बराच काळ रखडलेल्या या पुलाच्या कामाला  गती मिळाली असून जवळपास ८० टक्क्यांपेक्षा काम पूर्ण झाले असून नव्या वर्षात पूल वाहतुकीसाठी खुला होईल.  या पुलाच्या अभावी विक्रोळी पूर्वेकडे राहणारे लोक आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणारे वाहनचालकांना घाटकोपर किंवा  कांजूरमार्ग गांधीनगर, असा जवळपास अडीच किमीचा वळसा घालावा लागतो. 

कर्नाक पूल :

 हा पूल मध्य रेल्वेवरील सर्वांत जुना पूल म्हणून ओळखला जातो. सीएसएमटी ते मशिद बंदर स्थानकातील  या पुलाची निर्मिती १९६८ साली झाली. 

  १५४ वर्षे जुना असलेला हा पूल धोकादायक ठरवण्यात आला आणि त्या जागी नवा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. आयआयटी मुंबई आणि मध्य रेल्वेने पाहणी केल्यानंतर पूल धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. 

  जुना पूल पाडण्यासाठी रेल्वेने तब्बल २७ तासांचा   मेगाब्लॉक घेतला होता. जून २०२४ पर्यंत पूल पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Web Title: In this new year these four flyovers to be opened for mumbaikars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.