Join us
Daily Top 2Weekly Top 5

हजारोंच्या उपस्थितीत मुंबई भाजपच्या वतीने मराठी दांडिया दिमाखात झाली सुरवात

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 19, 2023 22:16 IST

काळाचौकीतील शहीद भगतसिंग मैदानावर तरुणाईच्या उत्साहाला उधाण

मुंबई-"उदे ग अंबे उदे"चा नारा देत मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित भव्य मराठी दांडियाची सुरुवात आज सायंकाळी काळाचौकी अभ्युदय नगर येथील शहीद भगतसिंग मैदानावर झाली. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. कार्यक्रमाला मुंबईकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारोंच्या संख्येने तरुणाई दांडिया आणि गरब्याच्या तालावर थिरकली. दि,१९ ते दि,२३ ऑक्टोबर या कालावधीत मराठी दांडिया महोत्सव सायंकाळी ७ ते १० सुरू असेल.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपनगर पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा,आ. मिहिर कोटेचा, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईतील पहिला मराठी दांडिया भारतीय जनता पक्षाने सुरू केला. मुंबईकरांची सेवा करण्याचे व्रत भाजपने घेतले आहे. या उत्सवातून एक विधायक ऊर्जा निर्माण होईल असे आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

या दांडियामध्ये साधारण १० हजाराहून अधिक मुंबईकरानी भाग घेतला होता. विविध गाण्याच्या ठेक्यांवर तरुणाईने नृत्य करीत उत्तरोत्तर दांडियाची रंगत वाढवली. गायक  अवधूत गुप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची उंची वाढत गेली. सिनेमा, नाटक, मालिका आणि सूत्रसंचालन यातील प्रत्येक भूमिका बखुबीने पेलणाऱ्या पुष्कर श्रोत्री यांनी कार्यक्रमात रंगत आणली. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनीही महोत्सवाला भेट दिली.

आरती आणि भोंडल्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.पारंपरिक मराठी पेहरावातील तरुणाई आणि बहारदार गाणी अशा उल्हासपूर्ण वातावरणात दांडिया रंगला. चित्त थरारक ढोल ताशा वादनाने कार्यक्रमात रंगत आली. चित्रपट कलावंतांची उपस्थिती, वाद्यवृंदाचा ठेका आणि नेटक्या संयोजनामुळे कार्यक्रमाला बहर आला.

वैविध्यपूर्ण नेपथ्य, आकर्षक रोषणाई गायक अवधूत गुप्ते यांची जोशपूर्ण गाणी आणि उत्तम वाद्यवृंदाने सर्वांना आकर्षित केले. नव्या वळणाचा दांडिया ठेका सादर करून तरूणांनी धमाल उडवली. मराठमोळी संस्कृती जोपासत तरुणांनी पारंपरिक वेशभूषेत दांडिया खेळून सर्वांचे लक्ष वेधले होते.. 

पारंपरिक वेशभूषा खास आकर्षण

मराठी दांडिया महोत्सवात पारंपरिक वेशभूषा खास आकर्षण ठरली. यात जोगवा मागणारी स्त्री, भगवाधारी साधू, भूपाळी, गाठोड डोक्यावर घेवून निघालेली चिमुकल्याची आई, राज महालातील स्त्री, गुढी खांद्यावर घेतलेला तरुण, रामशास्त्री प्रभुणे आदी वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.

 

टॅग्स :मुंबईदांडियानवरात्री