आमदार रवींद्र वायकर प्रकरणी पालिकेचा दोन महिन्यातच यू-टर्न!
By मनोहर कुंभेजकर | Updated: February 25, 2024 19:03 IST2024-02-25T19:03:03+5:302024-02-25T19:03:19+5:30
शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चेला आले उधाण

आमदार रवींद्र वायकर प्रकरणी पालिकेचा दोन महिन्यातच यू-टर्न!
मुंबई-गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या चौकशांच्या फेऱ्यात अडकलेले शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार व शिवसेना नेते रवींद्र वायकर प्रकरणी अचानक मुंबई महानगर पालिकेने यु--टर्न घेतल्याने ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील या चर्चेला उधाण आले आहे.मी शिवसेनेत गेली 50 वर्षं कार्यरत आहे,मला ईडीचा खूप त्रास होत असून एकतर तिकडे प्रवेश करा,नाही तर अटक असे दोनच पर्याय माझ्या समोर असल्याचे भावनीक पणे वायकर गेले काही दिवस पक्षाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात सांगत असल्याची माहिती उबाठाच्या सूत्रांनी लोकमतला दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दि,9 फेब्रुवारीच्या वाढदिवसाला आणि आणि नंतर गेल्या आठवडयात ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा उबाठा आणि राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.मात्र आता मुंबई महापालिकेने चक्क दोन महिन्यातच वेगळी भूमिका घेत आरक्षित भूखंडावर हॉटेल बांधल्यानंतर वायकरांनी नवा प्रस्ताव बीएमसीला दिला असून, महापालिकेने पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवली आहे.या खटल्यात सर्वोच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणार असून सदर प्रकरण निकाली लागल्यावर वायकर लवकरच शिंदे गटात प्रवेश
करतील अशी पुन्हा जोरदार चर्चा त्यांच्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात आहे.तर या संदर्भात खासदार संजय राऊत यांनीही एक ट्विट करत वायकर यांच्यावर प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणात मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर महिन्यात रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारावर ईडीनेही गुन्हा दाखल करून प्रकरणाचा त्यांचा तपास सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांच्या घरासह सात ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर वायकर यांची चौकशीही ईडीकडून करण्यात आली होती.
दरम्यान वायकर यांनी हॉटेल बांधकामासाठी परवानगी घेताना माहिती दडवून ठेवल्याचा आरोप झाला. त्यानंतर मुंबई महापालिकेने दिलेली परवानगी रद्द केली. याविरोधात वायकरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.पालिकेचा निर्णय योग्य ठरवत कोर्टाने वायकरांची याचिका फेटाळून लावली होती.
वायकर यांनी त्याविरोधात वायकर यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. मात्र वायकर यांच्या विरोधात पालिकेने आता अचानकपणे आपली पूर्वीची भूमिका बदलत वायकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्यास अनुकूलता दर्शवल्याने त्यांचा आता शिंदे गटात प्रवेश सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली आहे.