मुंबई :
महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईसह, ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई या महापालिकांमधील मेट्रो प्रकल्पांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आहे. तसेच मुंबई आणि पुण्यातील लोकल प्रवाशांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
वडाळा ते गेटवे मेट्रोमुंबईतील आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-११ प्रकल्पालाही मान्यता देण्यात आली. त्यासाठी २३ हजार ४८७ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. १७.५१ किमी लांबीच्या या मार्गिकेचा ७० टक्के भाग हा भुयारी आहे. यात १३ भूमिगत आणि १ भू-समतल स्थानक असेल.
२३८ एसी लोकल खरेदीसाठी निधी मंत्रिमंडळ बैठकीत एमयूटीपी प्रकल्पात २३८ एसी लोकल गाड्यांची खरेदी करण्यासाठी ४ हजार ८२६ कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड व राज्य शासनाच्या हिश्श्यातून देण्यास मान्यता देण्यात आली. या गाड्या कर्ज काढून खरेदी करण्याऐवजी रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून घेण्यात येणार आहेत.
याशिवाय १३६ किमी लांबीच्या व १४ हजार ९०७ कोटी रुपये खर्चाच्या तीन रेल्वे मार्गांनाही मंजुरी देण्यात आली. यातील ५० टक्के म्हणजेच ७ हजार ४५३ कोटी रुपयांचा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार आहे. यात बदलापूर-कर्जतदरम्यान तिसरी व चौथ्या रेल्वे मार्गिकांची उभारणी (३२.४६ किमी), आसनगाव-कसारादरम्यान चौथी रेल्वे मार्गिका (३४.९६६ किमी) आणि पनवेल ते वसईदरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर (६९ किमी) यांचा समावेश आहे.
ठाणे वर्तुळाकार मेट्रोच्या कर्जास दिली मान्यता ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरिडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरिडॉर, वनाज ते रामवाडीच्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) आणि पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक कर्ज घेण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुणे-लोणावळादरम्यान नव्या मार्गिकापुणे ते लोणावळादरम्यान तिसरी व चौथी उपनगरीय रेल्वे मार्गिका बांधण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पाची अंमलबजावणी मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत करण्यात येईल.
ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग सिडको महामंडळामार्फत करण्यास आणि त्यासाठीच्या ६ हजार ३६३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर सिडकोमार्फत करण्यात येणार आहे.
नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्तानागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता व त्यालगत ४ वाहतूक बेट विकसित करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणअंतर्गत हिंगणा तालुक्यातील गोधणी (रिठी) व लाडगाव (रिठी) येथील सुमारे ६९२ हेक्टरवर ‘नवीन नागपूर’अंतर्गत इंटरनॅशनल बिजनेस ॲण्ड फायनान्स सेंटर (आयबीएफसी) विकसीत करण्यात येणार आहे.