Join us

सात महिन्यांत दीड हजार कोटींचा प्रकल्प गेला अडीच हजार कोटींवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 06:36 IST

पालिका म्हणते स्वरूप बदलले म्हणून नव्याने काढल्या निविदा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहिसर ते भाईंदर पूल बांधण्यासाठी महापालिकेने २८ फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा निविदा काढल्या. त्यावेळी प्रकल्पाची किंमत १,५०० कोटी रुपये एवढी होती. मात्र, तांत्रिक कारण दाखवून पहिली निविदा रद्द करत १० ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. अवघ्या सहा महिन्यांत या कामाची रक्कम चक्क एक हजार कोटींनी वाढून ती २,५०० कोटी झाली. मर्जीतला कंत्राटदार निवडता यावा म्हणून महापालिकेने पहिल्या निविदेतील अटी, शर्ती बदलल्या अशी चर्चा आहे. मात्र, कोस्टल रोड आणि दहिसर ते भाईंदर पूल हे दोन प्रकल्प जोडले जात असल्याने कामाचे स्वरूप बदलले. म्हणून पुन्हा निविदा काढावी लागली, असे पालिकेचे म्हणणे आहे.

याआधीही महापालिकेने मुंबईतल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी ५ हजार कोटींच्या निविदा मागविल्या होत्या. मात्र कोणताही कंत्राटदार पुढे आला नाही. तेव्हा अटी आणि शर्तीचे कारण पुढे करत निविदा प्रक्रिया रद्द केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. दुसऱ्यांदा निविदा काढली ती थेट ६ हजार कोटींवर जाऊन पोहोचली. त्यामुळे कंत्राटदारांना झुकते माप मिळावे म्हणून निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचे आरोप होत आहेत.

दहिसर ते भाईंदर पूल बांधण्यासाठी महापालिकेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मदतीने पहिल्यांदा निविदा प्रक्रिया राबवली, तेव्हा केवळ एकाच कंत्राटदराकडून निविदा भरली गेली. ज्या कंत्राटदराने ही निविदा भरली त्याने महापालिकेच्या यापूर्वीच्या प्रकल्पांमध्येही काम केले होते. मात्र, महापालिकेने पहिली निविदा रद्द केली. पहिल्या निविदा प्रक्रियेत ज्या कंत्राटदाराने निविदा भरली त्याला या प्रकल्पाचे काम मिळू नये, म्हणून हे उद्याेग केल्याचे आरोप होत आहेत.

दरम्यान प्री-बिड मीटिंगमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना महापालिकेने बगल दिली. पहिल्या कंत्राटदाराने गुणवत्तेवर प्रकल्पाची व्याप्ती आणि पात्रता आवश्यकता पूर्ण केल्या असताना दुसऱ्या निविदा प्रक्रियेचा घाट घालण्यात आल्याने या कामातदेखील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे.

प्रकल्प नक्की कोणासाठी ?या पुलाचा फायदा वाहतुकीच्या दृष्टीने काहीच होणार नाही. कारण याची कनेक्टिव्हिटी कुठल्याच रस्त्याशी व्यवस्थित केलेली नाही. केवळ विकासकांना फायदा व्हावा म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यामुळे पश्चिम उपनगरातल्या तिवरांची पुन्हा एकदा कत्तल होणार आहे. -  गोपाल झवेरी, सदस्य, रोड मार्च अभियान

दहिसर ते भाईंदर या पूल प्रकल्पाच्या कामाचे स्वरूप आता बदलले आहे. पूर्वीच्या कामात हा रस्ता कोस्टल रोडला जोडलेला नव्हता. आता आपण याची कनेक्टिव्हिटी वाढविली आहे. या कारणाने या प्रकल्पाच्या कामाचे स्वरूप बदलले. त्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढावी लागली. - पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), मुंबई महापालिका

टॅग्स :मुंबई महानगरपालिका