Join us

मुंबईत जन्मही कमी, मरणाऱ्यांचे प्रमाणही घटले; वैद्यकीय प्रगतीमुळे आयुष्य वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 06:42 IST

वर्षाला एक लाखापेक्षा अधिक बाळांचे जन्म

संतोष आंधळे

मुंबई - दरवर्षी मुंबईतील रुग्णालयात एक लाखापेक्षा अधिक बाळं जन्माला येतात. गेल्या काही वर्षांत जन्म घेणाऱ्या अर्भकांची संख्या कमी असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून दिसून येते. दरवर्षाला जन्मदराच्या अनुषंगाने मुंबईची परिस्थिती चांगली असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कारण, मुंबईत जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही कमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मानवाचे आयुर्मान अधिक झाले आहे. आरोग्याच्या आधुनिक सुविधांमुळे नागरिक दुर्धर आजारांवर मात करत आहेत. तसेच अर्भक मृत्यूदरात मोठी घट दिसून येत आहे. बहुतांश बाळंतपणे रुग्णालयात होत आहेत. त्यामुळे माता अर्भकांचा मृत्यूदर कमी झाला आहे.

रुग्णालयांची आणि डॉक्टरांची संख्या मोठ्या पद्धतीने मुंबई शहरात दिसून येत आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या सुविधांचा लाभ मिळत आहे. मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे शहराबाहेरची मंडळीही मुंबईत येत असते. बाहेरून येणारे नागरिक आणि स्थानिक नागरिक यांची संख्या वर्षागणिक बदलत असते. २०११ नंतर आपल्याकडे जनगणना झालेली नाही. त्यामुळे मुंबईची आकडेवारी नेमकी किती, याबाबत विविध वेबसाईटवर वेगळी माहिती उपलब्ध आहे.

सध्याच्या घडीला आपल्याकडे तरुणांची संख्या मोठी आहे, त्यामुळे आणखी काही काळ आपली लोकसंख्या वाढत राहील. कारण, प्रजननक्षमता असणार मोठा तरुण वर्ग आहे. सध्या तत्काळ आपल्या व्यवस्थेवर परिणाम होणार नाही. कारण, परदेशात ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग मोठा आहे; पण तरुणांची संख्या कमी आहे. आपल्याकडे अजून तशी परिस्थिती नाही. यामुळे त्या तुलनेत व मुंबईच्या अनुषंगाने सध्या जन्मदर चांगला आहे -  डॉ. ऋजुता हाडिये, प्राध्यापक, विभागप्रमुख, जनऔषध वैदकशास्त्र, नायर रुग्णालय

२०११च्या जनगणनेनुसार देशाचा प्रजनन दर दोन टक्के होता, तो आता १.७ टक्के झालाय. याचा अर्थ गेल्या काही वर्षांत कुटुंब नियोजनाबाबत जे काही धोरण ठरवले होते, त्यामध्ये आपण यशस्वी होत आहोत. एका विशिष्ट टप्प्यात लोकसंख्या वाढत असते आणि कमी होत असते. सध्याच्या घडीला आपल्याकडे तरुण वर्ग मोठा आहे, आपण सध्या पायाभूत सुविधा वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईत जन्माला येणाच्यांची संख्यावाढ हा चिंतेचा विषय नाही. - डॉ. नंदिता पालशेतकर, वंध्यत्व तज्ज्ञ, लीलावती हॉस्पिटल