Join us  

उपनगरातील ५ मतदारसंघांत ३ लाखांपेक्षा जास्त मतदार, चांदिवलीत सर्वाधिक; तर कालिनात कमी मतदार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:28 AM

वाढत्या लोकसंख्येने विस्तारलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

मुंबई : वाढत्या लोकसंख्येने विस्तारलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सर्वाधिक मतदार हे उत्तर मध्य मुंबईत चांदिवली विधानसभेत आहेत. आजघडीला चांदिवलीत ४ लाख १७ हजार ११ एवढे एकूण मतदार आहेत, तर सर्वात कमी मतदार हे कालिना विधानसभा मतदारसंघात २ लाख ३३ हजार ८७९ एवढे आहेत, तसेच येथील पाच मतदारसंघांत ३ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. 

त्यानुसार,सर्वाधिक मतदार लोकसभा उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील चांदिवली विधानसभेत आहेत. चांदिवलीत ४ लाख १७ हजार ०११ मतदार आहेत. यापैकी २ लाख ३६ हजार ७३२ पुरुष मतदार, तर १ लाख ८० हजार २६४ महिला मतदार आहेत, तर १५ तृतीयपंथी मतदार आहेत. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३ लाख २९ हजार ५०४ मतदार आणि गोरेगाव विधानसभा मतदारसंघात ३ लाख १३ हजार २०९ मतदार आहेत, तर सर्वात कमी मतदार हे कालिना विधानसभा मतदारसंघात २ लाख ३३ हजार ८७९ आहेत. येथे १ लाख २५ हजार ६८२ पुरुष आणि १ लाख ८ हजार १८६ महिला मतदार आहेत.

सर्वच उमेदवारांसमोर एक आव्हान -

येथील पाच मतदारसंघांत ३ लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. त्यात बोरीवली (३,११,२९८), मालाड (३,२९,५०४), गोरेगाव (३,१३,२०९), मुकुंद शिवाजीनगर (३,०६,५९६) आणि चांदिवली (४,१७,०११) एवढे एकूण मतदार आहेत. या सर्वापर्यंत पोहोचणे लोकसभेच्या सर्वच उमेदवारांसमोर एक आव्हान राहणार आहे.

मालाडमध्ये ३३७ तृतीयपंथी मतदार -

आजघडीला मतदार यादीत नोंद असलेले सर्वाधिक ३३७ तृतीयपंथी मतदार हे मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहेत, तर घाटकोपर पश्चिम विधानसभेत ११९ तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे, तर उपनगरात विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या शून्य अशी आहे.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान