Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 11:16 IST

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मुंबईमधील विविध शिव मंदिरांमध्ये शिवभक्तांनी गर्दी केली होती.

मुंबई : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मुंबईमधील विविध शिव मंदिरांमध्ये शिवभक्तांनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा  लागल्या होत्या. या वेळी हर हर महादेवच्या घोषणेने आणि ओम नमः शिवायच्या जपाने मंदिरांचा परिसर दुमदुमून गेला होता. यंदा श्रावणात ५ सोमवार आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबईत अनेक प्राचीन मंदिर लोकप्रिय आहेत. यात १८ व्या शतकात निर्मिती करण्यात आलेले बाबूलनाथ मंदिरचा समावेश आहे. मलबाल हिलवर असलेल्या या मंदिरातील शिवलिंग बाभूळाच्या झाडाच्या सावलीत एका गुराख्याला दिसले होते, त्यामुळे या स्थानाचे बाबूलनाथ, असे नामकरण झालेले आहे. याच परिसरातील वाळकेश्वर-बाणगंगा मंदिरदेखील भाविकांना खुणावतात. मलबार हिलच्या टेकडीवरील प्राचीन वाळकेश्वर मंदिरातील वालुकेश्वर अर्थात वाळूच्या देवाचे स्थानही भाविकांमध्ये आस्थेचं प्रतिक आहे. 

पंतनगर, नवी मुंबई येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार हे पूर्वी रामेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध होते. आम्रनाथ मंदिर म्हणजेच आताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झाल्याचा उल्लेख येथील शिलालेखावर आढळतो. 

टॅग्स :मुंबई