Join us

अचानक १५०-२०० आंदोलक आले; पोलिसही गांगरले; पवारांच्या घराबाहेर नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 17:02 IST

शरद पवारांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन; चप्पलफेक, दगडफेकीमुळे तणावपूर्ण परिस्थिती

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सिल्वर ओकच्या गेटमधून आत येत जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली. यात घरावर चप्पल फेकण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. 

नेमकं काय घडलं?दुपारी सव्वा तीन-साडे तीनच्या सुमारास अचानक १५० ते २०० एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी तिथे केवळ २ पोलीस कर्मचारी होते. त्यावरून पोलिसांना या आंदोलनाची कोणतीही कल्पना नसल्याचं स्पष्ट होतं. आंदोलकांसमोर पोलिसांची संख्या तुटपुंजी होती. आंदोलक मुख्य रस्त्यावरून पवारांच्या घराकडे निघाले. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. चप्पल भिरकावल्या जात होत्या.

शरद पवारांच्या निवासस्थानाचा गेट बंद करण्याचा प्रयत्न सुरक्षारक्षकांनी केला. मात्र आंदोलकांचा रेटा पाहता तो निष्फळ ठरला. आंदोलक थेट पवारांच्या घराच्या अगदी जवळ पोहोचले. त्यांनी पवारांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानंच १२० हून जणांचा बळी गेला. या सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार असल्यानं त्यांच्या घराबाहेर आंदोलन करत असल्याचं कर्मचारी म्हणाले.

थोड्याच वेळात शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे तिथे पोहोचल्या. त्यांनी कर्मचाऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तुम्ही शांत राहा. आपण चर्चा करू, असं म्हणत त्यांनी आंदोलकांसमोर हात जोडले. मात्र आंदोलक आक्रमक होते. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी सुळेंसमोरच पवार कुटुंबीयांविरोधात घोषणाबाजी केली. 

यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस पवारांच्या घराबाहेर दाखल झाले. त्यांनी अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळली. आंदोलकांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे तणाव निवळला. याआधी अनेकदा पवारांच्या घराजवळ आंदोलनं झाली आहेत. मात्र ही सगळी आंदोलनं मुख्य रस्त्याजवळ झाली. पवारांच्या घराच्या अगदी बाहेर आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :शरद पवारएसटी संपसुप्रिया सुळे