Join us

प्रवाशांच्या समस्यांसाठी एसटी महामंडळाची धाव; प्रत्येक आगारात १५ जुलैपासून 'प्रवासी राजा' दिन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 11:47 IST

एसटीचे विभाग नियंत्रक आता आगारात प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेणार आहेत.

मुंबई : एसटीचे विभाग नियंत्रक आता आगारात प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना ऐकून घेणार आहेत. तसेच त्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही करणार आहेत. यासाठी १५ जुलैपासून प्रत्येक आगारात दर सोमवारी, शुक्रवारी प्रवासी राजादिन आयोजित केला जाणार आहे. प्रवाशांच्या समस्या, तक्रारी यांचे स्थानिक पातळीवरच निराकरण होण्याच्या उद्देशाने काम करता यावे यासाठी या दिनाचे आयोजन केले जाणार आहे.

प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी, सूचना या लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडू शकतात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील. प्रवासी राजादिन कधी, कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक त्या, त्यावेळी जाहीर केले जाईल. प्रत्येक तक्रारीची नोंद ठेवली जाणार आहे.

स्थानिक पातळीवर समस्या सोडविणार-

१) एसटी गाड्यांमधून दररोज ५४ ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. 

२)  बसस्थानक, त्यावरील प्रसाधनगृहे स्वच्छ, निर्जंतूक असावीत, अशी प्रवाशांची मागणी असते.  

३)  बस स्वच्छ व वेळेमध्ये धावाव्यात, चालक-वाहकांनी सौजन्याने वागावे, अशीही प्रवाशांची अपेक्षा असते. या बाबतच्या तक्रारींचे निराकरण स्थानिक पातळीवर व्हावे यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स :मुंबई