Join us

जेव्हीएलआर पूल बनलाय वाहतूककोंडीचा स्पॉट; नियोजनाचा अभाव, प्रवाशी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:23 IST

पूर्व द्रुतगती महामार्गावर जेव्हीएलआर उड्डाणपुलाचा परिसर आता वाहतूककोंडीचा नवा स्पॉट बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावर जेव्हीएलआर उड्डाणपुलाचा परिसर आता वाहतूककोंडीचा नवा स्पॉट बनला आहे. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वारंवार कोंडी होत असतानाच  त्याच्या सर्व्हिस रोडवरही वाहनांची रांग वाढू लागली आहे. विशेष करून संध्याकाळी आठ ते नऊ या एका तासात कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचे स्पष्ट समोर येत आहे.

जेव्हीएलआर उड्डाणपूल जिथे सुरू होतो, त्या पुलाखालून डाव्या बाजूचा रस्ता हा गांधीनगर पवई मार्गे जोगेश्वरीकडे जातो. तर ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहने उड्डाणपुलाचा वापर करतात. पुढे ऐरोली पुलामार्गे नव्या मुंबईत जाणे सोपे पडते. विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी उड्डाणपुलाखालून डावीकडून जाता येते. त्यामुळे संध्याकाळी या महामार्गावर मोठी वाहतूक असते.

वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव-

जेव्हीएलआर उड्डाणपुलाच्या खालून आणि वरून जाणाऱ्या वाहनांना किमान एक किलोमीटरच्या पट्ट्यात कोंडीचा भीषण सामना करावा लागतो. हा मार्ग मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असला तरी वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे. मात्र, त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून योग्य नियोजन होताना दिसत नाही.

कोंडीचे प्रमाण वाढले-

यापूर्वी आठवड्यातून दोन ते तीन वेळा येथे मोठी कोंडी होते. मात्र, अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढत आहे. मागील वर्षी हा उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी आठ दिवस बंद होता. तेव्हा तर या महामार्गावर कमालीची वाहतूककोंडी झाली होती. 

कारणे कोणती?

पुलाखाली एखादे वाहन बंद पडले किंवा पुलावरून जायचे की खालून, अशा वाहनचालकांच्या संभ्रमामुळे मागील वाहनांचा खोळंबा होतो. त्यातही डाव्या  दिशेला जाण्यासाठी रस्ता प्रशस्त नसल्याने वाहनांची गर्दी होते.

टॅग्स :मुंबईवाहतूक कोंडीजोगेश्वरी पूर्वविक्रोळी