Join us

माहेरवाशीण आलेल्या गौराईचा थाटमाट; भाजी-भाकरीसह आवडीचा नैवद्य अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 09:56 IST

माहेरपणासाठी आलेल्या गौराईंच्या सरबराईसाठी गेले काही दिवस कंबर कसून तयारीला लागलेल्या महिलांनी लिंबलोण उतरवून त्यांचे जंगी स्वागत केले. गौ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लाडक्या बाप्पांपाठोपाठ माहेरवाशिणी गौराईचेही मंगळवारी घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले. माहेरपणासाठी आलेल्या गौराईंच्या सरबराईसाठी गेले काही दिवस कंबर कसून तयारीला लागलेल्या महिलांनी लिंबलोण उतरवून त्यांचे जंगी स्वागत केले. गौराईंना पाचवारी, सहावारीसह नऊवारी साडी नेसवून विविध आभूषणांनी तिचा शृंगार करून मनोभावे त्यांचे पूजन केले. तिला तिच्या आवडीचा भाजीभाकरी, पुरणपोळीसह गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला.

गौराईचे आगमन अनुराधा नक्षत्रावर झाले. घराघरांत हळदी-कुंकवाची पावले काढत त्यावरून गौराईंना आणण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजन करत गौराईंची प्राणप्रतिष्ठापना झाली. पुढील दोन दिवस माहेरवाशिणी घरी पाहुणचार घेणार आहेत. बुधवारी महालक्ष्मींचे महापूजन करण्यात आले. यावेळी पुरणपोळी, करंजी-लाडू, सोळा प्रकारच्या भाज्या तसेच अन्य पदार्थांचा महानैवेद्य गौराईंना अर्पण केला गेला. 

पारंपरिक वेशभूषेत हळदी-कुंकू-

१) गौरीपूजनानिमित्ताने महिलांनी गौरींंसमोर त्यांच्यापुढे लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळे अशा विविध फराळासह फळे आणि गोडधोड पदार्थांची मांडणी करून आकर्षक सजावट केली आहे. 

२) याशिवाय आजूबाजूच्या महिलांना दर्शनासह हळदी-कुंकवासाठी आमंत्रणही देण्यात आले आहे.

रात्री जागरण अन् खेळ-

गौरीपूजनानंतर रात्री गौरीपुढे महिलांनी झिम्मा, फुगडी काटवट कणा, फेर धरून गौरीची गाणी म्हणत पारंपरिक खेळ खेळत जागरण केले. लाडक्या माहेरवाशिणींसोबत हसतखेळत वेळ घालवून गुरुवारी साश्रुनयनांनी निरोप दिला जाणार आहे.

मनोभावे सेवा-

वर्षभरानंतर माहेरवाशिणी घरी आल्याने त्यांच्यासाठी काय करू काय नको, असे महिलांना झाले असून त्यांच्या सेवेत कमतरता भासू नये, यासाठी महिला अधिक काळजी घेत आहेत.

टॅग्स :गणेशोत्सव 2024मुंबईगणेश चतुर्थी २०२४