Join us

गणेशोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांचे हाल! दिवसभर स्थानकातच राहावे लागले ताटकळत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:37 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी प्रवाशांचे हाल मात्र कोणी रोखू शकले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले असले तरी प्रवाशांचे हाल मात्र कोणी रोखू शकले नाही. मुंबई सेंट्रल स्थानकात बुधवारी सकाळपासूनच आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांसोबत इतरांनी गर्दी केली होती. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकात पहाटे ५ वाजता आलेल्या प्रवाशांना दिवसभर स्थानकातच ताटकळत राहावे लागले. दिवसभर नियंत्रकांकडून त्यांना संप असल्यामुळे गाड्या सुरू होतील की नाही याची शाश्वती नसल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. त्यामुळे महिनाभर अगोदर आगाऊ आरक्षण करूनदेखील आमची अशी हेळसांड कशासाठी, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून केला जात होता. 

आम्ही गणपतीला गावी जाण्यासाठी महिनाभर अगोदर बुकिंग केले. परंतु कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला. आता आम्ही पर्यायी व्यवस्था शोधू तरी कशी? आम्ही आता हतबल झालो आहोत, असे सुहास मोडक यांनी सांगितले.

उटंबर केळशीला जाण्यासाठी सकाळी पाचची दापोली गाडी पकडायला आम्ही इथे आलो. पण दुपारी १२ वाजेपर्यंत एकही गाडी नाही. माझ्यासोबत माझे वयस्कर आई, वडील आणि भरपूर सामान आहे. इथे नियंत्रकांकडून गाड्यांची माहितीदेखील देण्यात आली नाही. - प्रकाश वाजिरकर, प्रवासी. 

नालासोपारावरून सकाळी ८ ची रत्नागिरीसाठी आमची गाडी होती.  तिथून गाडी भेटली नाही म्हणून आम्ही मुंबई सेंट्रल आगारात आलो होतो. पण इथे येऊनही गाडी मिळत नाही. डेपोमध्ये असलेल्या दुसऱ्या गाड्या आम्हांला उपलब्ध करून द्यायला सांगितले, तर तेही केले नाही.- विजया पेंढारी, ७० वर्षीय वृद्ध प्रवासी.

टॅग्स :मुंबईगणेशोत्सव