Join us

लिपिक भरतीत ‘पदवी’चा जाच; परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णची अट रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 09:22 IST

मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती सुरू झाली असली तरी त्यासाठीच्या अर्जात घातलेल्या शैक्षणिक अटींमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर १,८४६ लिपिक पदांसाठी भरती सुरू झाली असली तरी त्यासाठीच्या अर्जात घातलेल्या शैक्षणिक अटींमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्जदार उमेदवार हा पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असायला हवा, ही अट जाचक ठरणार, असे दिसत आहे. आतापर्यंत २७ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

संबंधित अटीवर बोट ठेवत अर्ज नाकारले जात आहेत. अर्ज का नाकारला जात आहे याचे पत्रच पालिकेच्या प्रशासकीय विभागाकडून संबंधित उमेदवारांना पाठवले जात आहे. २० ऑगस्टपासून कार्यकारी सहायक (लिपिक) या १,८४६ पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी शैक्षणिक अर्हता, अटी, नियम याची माहिती पालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण ही अट जाचक असल्याची भावना व्यक्त होत आहे. ज्या उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे जोडली आहेत, त्या कागदपत्रांची संबंधित महाविद्यालयांशी संपर्क साधून पडताळणी केली जात आहे. जे उमेदवार पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले नसतील, त्यांचा अर्ज बाद ठरवून त्यांना याबाबत लेखी कळवले जात आहे.

कामगार संघटनेचाही अटीस आक्षेप -

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी जाहिरातीतील जाचक अटी वगळून शुद्धीपत्रक काढण्याची मागणी केली आहे. कार्यकारी सहायक पदासाठी निवड परीक्षा घेतली जाणार असेल तर पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असणे, ही अट का  ठेवण्यात आली, असा सवाल केला आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही अशा अटी ठेवल्या जात नाहीत, याकडे युनियनने प्रशासनाचे लक्ष वेधले.

काही विशिष्ट प्रवर्गातील उमेदवारांना टंकलेखन परीक्षा नियुक्तीपासून दोन  वर्षांत उत्तीर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे. ती सरसकट सर्वच उमेदवारांना देण्यात यावी, अशी मागणी युनियनने केली आहे.

अनुकंपा तत्त्वावर किंवा अग्रहक्काने नोकरी मिळविण्याची वेळ येते तेव्हा ‘पहिल्याच प्रयत्नात पदवीधर’ या अटीमुळे त्यांना ‘कामगार’ पदासाठीच पात्र ठरविले जाते. पदवी किंवा द्वीपदवीधर असूनही या कर्मचाऱ्यांच्या मुलांना लिपिकपदी नियुक्ती दिली जात नाही, असे युनियनने आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

आदित्य ठाकरेंचे आयुक्तांना पत्र-

१) पदवीची अट जाचक असून त्यामुळे राज्यातील दोन ते तीन लाख मुला-मुलीना लिपिक पदासाठीचे अर्ज भरता येणार नाहीत. 

२) सध्या महाराष्ट्रातील बेरोजगाराची भयावह परिस्थिती लक्षात घेता, या अटीचे पुनर्विचार करावा व अटीत बदल करावा. 

३) त्यामुळे अधिकाधिक उमेदवारांना अर्ज करता येईल, अशी मागणी उद्धव सेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकानोकरी