Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता निसर्गरम्य वातावरणात जोपासा वाचनाचा छंद; माटुंग्यात मुक्त ग्रंथालयाचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 10:32 IST

मुंबई महापालिकेने माटुंगा येथील नानालाल डी. महता पुलाखालील मोकळ्या जागेत मुक्त ग्रंथालय (ओपन लायब्ररी) सुरू केले आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेने माटुंगा येथील नानालाल डी. मेहता पुलाखालील मोकळ्या जागेत मुक्त ग्रंथालय (ओपन लायब्ररी) सुरू केले आहे. तेथे वाचकांना निःशुल्क पुस्तके वाचायला मिळणार आहेत. मुंबईत प्रथमच हा प्रयोग करण्यात आला असून, ज्येष्ठांसह विद्यार्थ्यांना विरंगुळ्यासह वाचनाचा आनंद लुटता येणार आहे.

वाचकांसाठी निःशुल्क पुस्तके-

सद्यःस्थितीत या ठिकाणी एकूण १३२ पुस्तके वाचनासाठी निःशुल्क उपलब्ध आहेत. हे ग्रंथालय सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार असून, तिथेच बसून पुस्तके वाचता येणार आहेत.

विरंगुळा आणि करमणुकीसोबतच ज्ञानार्जनआणि वाचनाची सवय वृद्धिगतहोण्याच्या अनुषंगाने नानालाल डी.मेहता उद्यानात हे ग्रंथालय सुरूकरण्यात आले आहे. नागरिकांनीआणि विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. - डॉ. पृथ्वीराज चौहान, सहायक आयुक्त, एफ उत्तर विभाग

पालिकेच्या वतीने एफ उत्तर विभागात २०१६ मध्ये नानालाल डी. मेहता उद्यान हे नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे. पुलाखालील जागेवर तयार केलेले हे मुंबईतील पहिलेच उद्यान आहे. सहा हजार ३४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानामध्ये ९०० मीटर लांबीचा पदपथ, योगाभ्यास आणि बसण्यासाठी विशिष्ट आसनव्यवस्था, शोभिवंत झाडे लावलेली आहेत. अशा निसर्गरम्य वातावरणात सुरू केलेल्या मुक्त ग्रंथालयामध्ये विविध साहित्यांची पुस्तके, महापुरुषांची आत्मचरित्रे, सामान्यज्ञान, खेळ आदी विषयांची पुस्तके वाचण्यास मिळणार आहेत. या ग्रंथालयाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी गबुला फाउंडेशन, इनरव्हील संस्थेचे प्रतिनिधी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकावाचनालय