Join us

डिजिटल होर्डिंग्जवर बंदीचा विचार? पालिकेच्या बैठकीत चर्चा; तक्रारींमध्ये वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 09:58 IST

मुव्हिंग पिक्चरच्या (डिजिटल) होर्डिंग्जना मुंबईत मागणी वाढत आहे.

मुंबई : मुव्हिंग पिक्चरच्या (डिजिटल) होर्डिंग्जना मुंबईत मागणी वाढत आहे. मात्र, द्रुतगतीसह अन्य मार्गांवर लावलेल्या या होर्डिंग्जवर झळकणारी चलचित्रे, प्रखर प्रकाश, यामुळे वाहन चालविताना लक्ष विचलित होत असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे भविष्यात केवळ प्रकाशमान होर्डिंग्जना परवानगी देऊन डिजिटल म्हणजेच चलचित्र असणाऱ्या होर्डिंग्जवर बंदी आणावी का, असा विचार डिजिटल होर्डिंग्जसाठी स्थापन केलेल्या समितीकडून सुरू आहे. मात्र, अशा होर्डिंग्जमुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असून, हा व्यवसायही मोठा आहे. त्यामुळे अद्याप यावर चर्चा सुरू आहे.

डिजिटल होर्डिंग्जबाबत धोरण ठरविण्यासाठी स्थापन झालेल्या समितीची बैठक मंगळवारी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात पार पडली.  या बैठकीत या सदस्यांकडून डिजिटल होर्डिंग्जच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. 

या बैठकीत विशेषतः इल्युमिनिटेड म्हणजे प्रकाशमान होर्डिंग्जवर चर्चा झाली. या होर्डिंग्जच्या प्रकाशामुळे अनेकदा रस्त्यावर, द्रुतगती मार्गावर वाहनचालकांच्या डोळ्यांवर सतत ताण येतो. त्यामुळे या होर्डिंग्ज प्रकाश किती असावा, तो कसा मोजावा, त्याची रेंज काय असावी, याची नियमावली आवश्यक असल्याची चर्चा झाली.

नियंत्रण आवश्यक -

१) पारंपरिक जाहिरात फलकांचे डिजिटलमध्ये रूपांतर करण्याचा वेग वाढत आहे. मात्र, डिजिटल होर्डिंग्ज वाहनचालकांचे, नागरिकांचे, पादचाऱ्यांचे सायंकाळी व रात्रीच्या वेळेस लक्ष विचलित होण्यास कारणीभूत ठरतात, अशा तक्रारी येत आहेत. 

२) अपघाताची धोका आहे. त्यामुळे विविध विभागांशी आणि त्यातील तज्ज्ञांशी चर्चा करून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, अशा माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  

आवश्यक उपकरणांची खरेदीही करणार- पालिका क्षेत्रात एकूण जवळपास ५९ प्रकाशमान होर्डिंग्ज आहेत. या होर्डिंग्जचा प्रकाश किती आहे? दिलेल्या रेंज पेक्षा तो कमी आहे की जास्त? हे मोजण्यासाठी पालिका स्पेक्ट्रोरेडिओ मीटर, फोटोमीटर अशा उपकरणांची खरेदी केली जाणार आहे.  

...तर अनामत रक्कम जप्त  

१) पालिका प्रशासनाने रात्री ११ वाजल्यानंतर डिजिटल होर्डिंग्ज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

२) पालिकेच्या पथकाकडून रात्रीची तपासणी केली जाते असून, असे होर्डिंग सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित होर्डिंग कंपनीची अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकारस्ते सुरक्षा