Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोस्टल रोड ते वांद्रे सफर लांबणीवर; पावसामुळे अडथळे, मार्गिका सुरू करण्याचा मुहूर्त हुकणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 09:38 IST

कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी हा या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प (कोस्टल रोड) ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असून, उर्वरित कामेही वेगाने पूर्ण केली जात आहेत. या रस्त्याचे दोन्ही बोगदे वाहतुकीस खुले केल्यानंतर वांद्रे-वरळी सी लिंक आणि कोस्टल रोड सुरू करण्यासाठी पालिकेचे नियोजन सुरू आहे. त्याकरिता दोन्ही बाजूंच्या बो स्ट्रिंग आर्च गर्डरची जोडणी पूर्ण झाली आहे. मात्र, ही मार्गिका सुरू होण्यास पावसामुळे विलंब होणार असल्याने १० जुलैचा मुहूर्त हुकणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

कोस्टल रोडला वांद्रे-वरळी सी लिंकची जोडणी हा या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आहे. कोस्टल रोडमुळे मरिन ड्राइव्ह ते वरळी हा प्रवास अवघ्या काही मिनिटांवर आल्यानंतर आता मुंबईकरांना थेट मरिन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास काही मिनिटांत करण्याची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याच्या कामाच्या पाहणीवेळी दोनपैकी एक वाहिनी जुलैअखेर सुरू करावी, अशा सूचना केली होती. 

मात्र, पावसामुळे या रस्त्यावरील काँक्रिटीकरण आणि क्युरिंगची कामे करण्यात अडथळे येत आहेत. रस्त्यांच्या कामांमध्ये पावसाचे पाणी गेल्यास काँक्रिटचा दर्जा खालावण्याची शक्यता असते. त्यामुळे ते पूर्णपणे सुकण्यासाठी किमान सलग २४ तासांहून अधिक काळाची आवश्यकता आहे. सध्या पावसाच्या दिवसांत हे काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाऊण तासाचा प्रवास १२ मिनिटांत शक्य-

कोस्टल रोड प्रकल्पातील कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जात आहेत. १०.५८ कि.मी.चा कोस्टल रोड आणि ४.५ कि.मी. लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडणारे दोन्ही महाकाय गर्डर बसविले आहेत. त्यामुळे लवकरच वांद्र्याहून- दक्षिण मुंबई असा पाऊण तासाचा प्रवास अवघ्या १२ मिनिटांत करता येणे शक्य आहे. 

... यालाही लेटमार्क 

१) सुरू झालेल्या नवीन बोगद्यामुळे अमरसन्स उद्यान आणि हाजीअली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. 

२)  यामध्ये प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने, तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल. 

३) उत्तर दिशेला प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी पुढील टप्प्यात बिंदूमाधव ठाकरे चौकापर्यंतचा किनारी रस्ता १० जुलैपर्यंत सुरू करण्याचे नियोजन पालिकेचे होते; मात्र पावसामुळे या नियोजनालाही लेटमार्क लागणार आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकावांद्रे-वरळी सी लिंकराज्य सरकार