Join us

मुंबईत ९० टक्के शिक्षकांना लागली बीएलओची ड्युटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 09:52 IST

सर्व शिक्षकांना तातडीने मुक्त करावे; अन्यथा या कामावर बहिष्कार घालू, असा इशारा आता शिक्षक भरती या शिक्षक संघटनेने दिला आहे.

मुंबई : मुंबईत ९० टक्के शिक्षकांना बीएलओ ड्यूटी लावण्यात आली आहे. या सर्व शिक्षकांना तातडीने मुक्त करावे; अन्यथा या कामावर बहिष्कार घालू, असा इशारा आता शिक्षक भरती या शिक्षक संघटनेने दिला आहे. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी आज मंत्रालयात शिक्षणमंत्री आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली.

दहावी, बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. या स्थितीत मुंबई महानगर क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या ९० टक्के शिक्षकांना काम लावण्यात आले आहे. यामुळे शालेय कामकाज कोलमडून पडेल आणि परीक्षा घेणे अवघड होईल. यासंदर्भात हायकोर्टाचे आदेश स्पष्ट आहेत. ही सगळी वस्तुस्थिती शिक्षणमंत्री आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. बीएलओ ड्यूटीमधून या सर्व शिक्षकांना तातडीने मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काम स्वीकारू नये... 

शिक्षकांनी हे काम स्वीकारू नये. प्रत्यक्ष निवडणूक आणि जनगणना याव्यतिरिक्त अन्य कोणतेही काम शिक्षकांना बंधनकारक नाही. कोणतीही कार्यवाही होणार नाही. कार्यवाही केल्यास शिक्षक भारती कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी केले आहे.

टॅग्स :निवडणूकशिक्षक