Join us
Daily Top 2Weekly Top 5

वेसावे कोळीवाड्यातील तोडक कारवाईला वाचा फोडण्यासाठी सभा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 17:09 IST

वेसावे कोळीवाड्यातील विविध समस्या आणि नुकताच झालेल्या तोडक कारवाईला वाचा फोडण्यासाठी श्री सिन्यामहादेव मंदिराच्या परिसरात सभा संपन्न झाली.

मनोहर कुंभेजकर, मुंबई: वेसावे कोळीवाड्यातील विविध समस्या आणि नुकताच झालेल्या तोडक कारवाईला वाचा फोडण्यासाठी श्री सिन्यामहादेव मंदिराच्या परिसरात सभा संपन्न झाली. वेसावे गावात वेसावे शिवकर कोळी समाज ट्रस्ट आणि वेसावे कोळी जमात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने  सलग चार तास या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

शिवकर कोळी समाज तसेच गावातील स्थानिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी वेसावे शिवकर कोळी समाज ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष  विजय भानजी यांच्या पुढाकाराने या सभेचे शांततापूर्ण आयोजन केले होते. समाजासाठी जीव गेला तरी बेहतर, पण अश्या शेवटपर्यंत अशा असंवैधानिक बाबींसाठी लढत राहीन असा  इशारा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. 

एकूणच साऱ्या जमलेल्या विविध मंडळांच्या कार्यकारी सदस्यांचा सूर हा, परप्रांतीयांना फुकटात घरे देणाऱ्या महानगरपालिकेने बेकायदेशीर आणि अधिकाऱ्यांच्या मुजोर पद्धतीने चाललेल्या कारवाईच्या विरोधात निषेध व्यक्त केला.

सभेसाठी कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे  विधान परिषदेचे सदस्य रमेश पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.वेसाव्याची तोडक कारवाई उपमुख्यमंत्री  देवंद्र फडणवीस यांच्या प्रखर नेतृत्वामुळे थांबवता आली. पण भविष्यातल्या संकटाच्या सामन्यासाठी आपण आतापासूनच सुरवात केली पाहिजे, मी आणि कोळी महासंघ आपल्यापाठीशी कायम उभे आहोत, तुमच्या कोणत्याही संकटात आम्ही आहोतच अशी ठाम ग्वाही त्यांनी वेसावकरांना दिली.

कोळी महासंघाचे सरचिटणीस आणि वेसावे कोळी जमात ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजहंस टपके यांनी मुंबईतील चाललेल्या आणि निसर्गाला हानिकारक असणाऱ्या विविध विकासकामाची यादी वाचून दाखवली आणि असल्या कोणत्याही विकासकामांवर बंदी किंवा कारवाई का होत नाही तर अधिकारी आणि बड्या नेत्यांची यात छुपे संबंध असतात असे जाहीरपणे मांडले. निसर्गावर अवलंबून असलेल्या कोळी समाजाला स्वातंत्र्यानंतर पद्धतशीरपणे विस्थापित करण्याचा कुटील डाव गेल्या कैकवर्षापासून सुरु आहेच आणि आता ती प्रमाणाबाहेर वाढली आहेत असा टोला टपके यांनी लगावला. 

अमेरिकेच्या धर्तीवर बायडेन ट्रम्प प्रमाणे गावातील सर्वानी आता हि वेळ एकजूट राखण्याची आहे, असे बहुतेक संस्थांच्या मान्यवरांनी नमूद केले. 

सदर संयुक्त सभा वेसावे गावात प्रथमच होत असल्यामुळे श्री प्रदीप टपके यांनी दि,१६ जुलै हा गावासाठी 'एकात्मता दिवस' म्हणून पाळला जावा अशी सूचना केली. युवकांचे अभ्यासगट तयार व्हावे जेणेकरून गावातल्या विविध समस्यांना सैवेधानिक पद्धतीने आणि शासकीय ध्येय धोरणांचे पालन करून सोडवता येतील. 

सदानंदाचा येळकोट करताना संविधानाचा येळकोट करावा लागेल असे विकास  कोळी यांनी मांडले. तर जागृती भानजी, हरेश्वर घुस्ते, डॉ. गजेंद्र भानजी, जयराज चंदी इत्यादी मान्यवरांनी सभेचे मार्गदर्शन केले. डॉ चारूल भानजी यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.यावेळी वेसावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईवर्सोवा