Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या पोटातून काढला ५ किलोचा गोळा, असह्य त्रासातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 10:07 IST

वैद्यकीय विश्वात होत असलेल्या प्रगतीमुळे अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सार्वजनिक रुग्णालयात केल्या जात आहेत.

मुंबई : वैद्यकीय विश्वात होत असलेल्या प्रगतीमुळे अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सार्वजनिक रुग्णालयात केल्या जात आहेत. अशा पद्धतीची शस्त्रक्रिया मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात करण्यात आली. डॉक्टरांनी महिलेच्या पोटातून तब्बल ५ किलोंचा ट्यूमर काढला आणि असह्य वेदनांमधून तिची सुटका केली.   

सुमारे तीन महिन्यांपासून पोटात दुखते, गोळा आल्यासारखे वाटते, श्वास घेणेही कठीण वाटते, या वेदनेने व्याकूळ झालेली महिला अनेक खासगी रुग्णालयांच्या पायऱ्या चढली. मात्र, तेथे आजाराचे निदान झाले नाही. अखेर ती महापालिकेच्या  व्ही. एन. देसाई रुग्णालयात आली. तेथे विविध अत्याधुनिक चाचण्या करण्यात आल्या. एमआरआय तपासणीत महिलेच्या पोटात उजव्या भागात एक गळू (सिस्ट) आढळून आला. त्याला वैद्यकीय परिभाषेत ‘मुसिनस सिस्टऍडेनोमा’ म्हणतात.  महिलेच्या ओटीपोटाजवळ अंदाजे २१ सेंटीमीटर बाय २० सेंटीमीटर आकाराचा गोळा दिसत होता. जगभरात बीजकोशाच्या गाठींपैकी केवळ १५ टक्के ‘मुसिनस सिस्टऍडेनोमा’ असतात. 

सीटी स्कॅन, सोनोग्राफी आदी अहवाल प्राप्त झाल्यानंतर, एकूणच स्थिती लक्षात घेता या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. ललिता मायदेव, डॉ. श्वेता काशीकर आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्याच्या  पथकाने निर्णय घेतला आणि २४ सेंटीमीटर बाय २३ सेंटीमीटर आकाराचा अनेक कप्पे असलेला मांसल गोळा अर्थात ट्यूमर बाहेर काढण्यात आला

महानगरपालिका सर्वसाधारण उपनगरीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या डीएनबी अभ्यासक्रमामुळे व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये अशा प्रकारची आव्हानात्मक शस्त्रक्रिया करता आली. अद्ययावत यंत्रणेच्या मदतीने उपनगरीय रुग्णालयांमध्ये जटिल आणि पूर्वी कधीही न केलेल्या अशा अवघड स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करणेदेखील शक्य होत आहे.- डॉ. ललिता मायदेव, स्त्रीरोग विभागप्रमुख, व्ही. एन. देसाई रुग्णालय

या त्रासात प्रसूती :

पोटाचा वाढता आकार, श्वास घेण्यास त्रास व दैनंदिन जीवनात अतिथकवा या तक्रारींमुळे २६ वर्षीय महिला कमालीची त्रस्त होती. त्यांच्या पोटात सतत दुखत होते. तसेच त्यांचे वजन असाधारणपणे वाढत होते. या महिलेचा दोन वेळा गर्भपात झाला होता. त्यानंतर यशस्वी गर्भधारणा व प्रसूती होऊन मूल झाले.

टॅग्स :मुंबईहॉस्पिटल