Join us
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव, ११ वर्षांत वाढता प्रतिसाद; गणेशोत्सवासाठी पालिकेची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 09:43 IST

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने मुंबई महापालिकेने रस्त्यांची डागडुजी तसेच विसर्जनासाठी चौपाट्यांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने मुंबई महापालिकेने रस्त्यांची डागडुजी तसेच विसर्जनासाठी चौपाट्यांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे पालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आवाहनाला भाविकांचा प्रतिसाद वाढत असून, गेल्या ११ वर्षांत कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या प्रमाणात तब्बल ३७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येणार असून, संपूर्ण मुंबईत २०४ कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. 

गेल्या वर्षी होते १९४ तलाव-

पालिकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. गेल्या वर्षी १९४ कृत्रिम तलाव होते. त्यात ७६ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. 

गुगल मॅपवर लोकेशन-

१) यंदा ‘गुगल मॅप्स’मध्ये कृत्रिम तलावांचे लोकेशन समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच ‘क्यूआर कोड’द्वारे भाविकांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. 

२) हा ‘क्यूआर कोड’ गणेश मूर्तिकारांच्या मंडपाबाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे. 

३) त्याचबरोबर पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने मूर्तिकारांना शाडूची मातीही पालिकेने उपलब्ध करून दिली आहे. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकागणेशोत्सव