Join us

कांदिवलीत सिलिंडरचा पाण्यात उलटा ठेवून वापर; निष्काळजीपणामुळे उडाला भडका, सात जण हाेरपळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 09:05 IST

या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. विद्युत यंत्रणा व विजेच्या तारांमुळे आग पसरल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

मुंबई - स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलिंडरमधून गळती झाल्याने भीषण आग लागून सात जण होरपळल्याची घटना बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास कांदिवली येथे घडली.  मिलिटरी मार्गावरील ‘ईएसआयसी’ रुग्णालयामागील राम किसन मेस्त्री चाळीतील एका गाळ्यात ही घटना घडली. गळती होत असलेला गॅस साचून राहिल्याने अचानक भडका उडाला आणि दुर्घटना घडली. आगीत होरपळलेल्या सर्व जखमींवर विविध ठिकाणच्या तीन रुग्णालयांत उपचार सुरू असून, जखमींमध्ये एक पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे.

बऱ्याच दिवसांपासून ही गॅस गळती सिलिंडरमधून होत होती, मात्र गाळेधारक गॅस सिलिंडर पाण्यात उलटा करून त्याचा वापर करत होते. त्यांच्या याच निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.  गॅस गळती सुरू असतानाच अचानक शॉर्ट सर्कीट झाला आणि ठिगणी उडाली. त्यामुळे गॅसचा भडका उडाला आणि तेथे असलेले सर्वच जण होरपळले. त्याठिकाणी काही तेलाचे डबेही होते. त्यांनीही पेट घेतल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले आणि सात जण गंभीर भाजले.  या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. विद्युत यंत्रणा व विजेच्या तारांमुळे आग पसरल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

पोलिस काय म्हणतात?समतानगर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी सकाळी सुमारे नऊ वाजता, शिवानी आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी दुकानात स्वयंपाक सुरू केला असताना अचानक आग भडकली. प्राथमिक तपासानुसार, गॅसगळतीमुळे आग लागली असून ती इलेक्ट्रिक वायरिंग, एलपीजी सिलिंडर, रेग्युलेटर आणि स्टोव्हद्वारे आणखी भडकली. संबंधित दुकान हे ग्राउंड-प्लस-वन मजल्याचे होते. त्यानुसार यामागच्या नेमक्या कारणाचा आम्ही तपास करत आहोत.

स्थानिक रहिवाशांकडून आग विझविण्याचा प्रयत्नस्थानिक रहिवासी जयप्रकाश मिस्त्री हे घरी असताना त्यांना गॅसचा वास जाणवला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी घरात पाहिल्यावर काही आढळले नाही, म्हणून ते घराबाहेर पडले आणि त्यांना शिवानी यांच्या दुकानाला आग लागल्याचे दिसले.  त्यांनी तत्काळ फायर एक्स्टिंग्विशर घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या पायाला किरकोळ भाजले. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींनाही आग लागली होती. मिस्त्री यांनी त्वरित अग्निशमन दलाला कळवले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.

तीन रुग्णालयांत उपचार सुरू जखमींपैकी चौघांना सुरुवातीला नजीकच्या ‘ईएसआयसी’ रुग्णालयात, तर उर्वरित जखमींना ‘बीडीबीए’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर चौघांना ऐरोली बर्न हॉस्पिटल, येथे तर एकाला कस्तुरबा आणि दोघांना बोरिवली येथील एयूएम हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे. जखमींपैकी सहा जण ७० ते ९० टक्के भाजले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kandivali: Gas Leak Explosion Injures Seven Due to Negligence

Web Summary : Seven injured in Kandivali gas leak explosion. Negligence suspected as residents used cylinder upside down in water. Short circuit ignited leaking gas, causing severe burns. Firefighters responded, and victims are hospitalized; investigation ongoing.
टॅग्स :गॅस सिलेंडर