Join us  

निवडणुका गाजविणारे प्रसिद्ध मैदान अडगळीत; नागरिकांनी प्रशासनासह राजकारण्यांचे लक्ष वेधले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 10:37 AM

धारावीतल्या एन. शिवराज मैदानाकडे महापालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

मुंबई : शहर आणि उपनगरात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच धारावीतल्या एन. शिवराज मैदानाकडे महापालिका प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्याची वाताहात झाली असून, स्थानिकांनी प्रशासनासह राजकारण्यांचे याकडे लक्ष वेधले आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी अनेक उमेदवारांच्या भाषणांनी, सांस्कृतिक कार्यक्रमांनी हे मैदान गाजले आहे. मात्र, ऐन निवडणुकीत त्याकडे पाहण्यास कोणालाही वेळ नाही, अशी अवस्था आहे.

गेल्या सहा वर्षांपासून हे मैदान दुरवस्थेत आहे. फेब्रुवारी महिन्यात मैदानाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्याचा मनःस्ताप स्थानिकांना होत आहे. झाडांना पाणी नाही. मैदानात मातीचे ढिगारे असून, धुळीने माखले आहे. त्यामुळे स्थानिकांना त्याचा वापर करता येत नाही. भिंतींना अर्धवट प्लास्टर आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले साहित्यही तुटले आहे. पाण्याची टाकी नादुरुस्त आहे. निवडणुकीच्या अनेक उमेदवारांच्या सभा मैदानात झाल्या आहेत. हजारो लोकांना एकाच वेळी सामावून घेणाऱ्या या मैदानात अनेक राजकीय नेतेमंडळींच्या सभा गाजल्या आहेत. सध्या उमेदवार आणि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, अशी माहिती धारावी नागरिक समितीचे दिलीप गाडेकर आणि गिरीराज शेरखाने यांनी दिली.

या नेत्यांच्या झाल्या सभा-

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड आणि माजी आमदार बाबूराव माने यासारख्या राजकीय नेत्यांनी या मैदानात सभांसह विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने हजेरी लावली आहे. याव्यतिरिक्त दक्षिण भारतीय नेते, अनेक मंत्र्यांनीही विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मैदानात हजेरी लावली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भातील अनके आंदोलने, सभा मैदानात झाल्या आहेत, असे धारावी नागरिक समितीच्या दिलीप गाडेकर यांनी सांगितले. दिग्गज नेत्यांनी मैदानात हजेरी लावली असतानाच आता मात्र मैदानाची झालेली दुरवस्था वाईट आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४धारावी