Join us

वांद्रेत भाजीचा टेम्पो दुभाजकाला धडकला ! एकाचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल

By गौरी टेंबकर | Updated: March 4, 2024 17:00 IST

तक्रारीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ते गोरख कुशवाह (३८) याच्यासह भाजी आणण्यासाठी गुप्ताच्या टेम्पोमधून दादरला निघाले होते.

मुंबई: वांद्रेमध्ये एक भाजीचा टेम्पो रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी चालक राजेश गुप्ता याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार लालबहादूर यादव (३७) हे कांदिवली परिसरात भाजीविक्रीचे काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ते गोरख कुशवाह (३८) याच्यासह भाजी आणण्यासाठी गुप्ताच्या टेम्पोमधून दादरला निघाले होते. यादव हे गुप्ता च्या बाजूला तर गोरख हा मागे बसला होता. त्यांची गाडी जवळपास ४ च्या सुमारास वाकोला ब्रिज उतरत असताना गुप्ताचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो थेट जाऊन रस्ता दुभाजकाला धडकला आणि अपघात झाला.

स्थानिकांची त्या ठिकाणी गर्दी झाल्यावर काही लोकानी जखमींना रिक्षात बसवून गुरुनानक रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. त्या ठिकाणी उपचारासाठी अधिक खर्च येत असल्याने कुशवाह याला त्याच्या नातेवाईकांनी सायन रुग्णालयात हलवले. तिथे त्याला दाखल करून घेत उपचार सुरू होते. मात्र २ मार्च रोजी त्याने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. त्यानुसार यादवच्या तक्रारीवरून खेरवाडी पोलिसांनी गुप्तावर संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :मुंबईअपघात