Join us  

महापालिकेच्या प्रयत्नांमुळे सुधारला पाण्याचा दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 2:28 AM

अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश; भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया

मुंबई : भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) नुकत्याच जाहीर केलेल्या २१ राज्यांच्या राजधानीतील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत मुंबई शहर अव्वल ठरले आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठीगेली काही वर्षे महापालिकेचा प्रयत्न सुरू होता. त्याचेच हे यश असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.केंद्रीय ग्राहक संरक्षणमंत्री राम विलास पासवान यांनी २१ शहरांच्या या रँकिंगमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पहिला क्रमांक दिला आहे. म्हणजेच देशात मुंबईच्या पाण्याची गुणवत्ता सर्वात चांगली असल्याचे आढळून आले आहे. स्वच्छता अभियानातील रँकिंग घसरल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या मुंबईसाठी ही गोड बातमी दिलासा देणारी ठरली आहे. ठाणे जिल्ह्यातील धरणातून जलवाहिनीद्वारे मुंबईला दररोज पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी भांडुप येथील जलशुद्धिकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया करण्यात येते.त्याचबरोबर, पाण्याचा दर्जा सुधारण्यासाठी जलवाहिन्यांची नियमित दुरुस्ती व गळती शोधण्याचा कार्यक्रम जल अभियंता विभागामार्फत सुरू असतो. बीआयएसने निश्चित केलेल्या आदर्श मानकांनुसार बाटलीबंद पाणीविक्रेत्या कंपन्यांप्रमाणेच पालिकेची पाणीशुद्धिकरण प्रक्रिया पार पडते, असा दावा वार्षिक पर्यावरण अहवालात करण्यात आला आहे.काही महिन्यांपूर्वी महापालिकेने घेतलेल्या पाण्याच्या दोनशे नमुन्यांमध्ये केवळ ०.७ टक्के पाण्याचे नमुने पिण्यास अयोग्य होते, असे आढळून आले, तर २०१७-१८ मध्ये हे प्रमाण एक टक्का एवढे होते.पालिकेमार्फत (पावसाळ्यात अथवा दूषित पाणीपुरवठ्याची तक्रार असलेले विभाग) दररोज दोनशे अथवा तीनशे पाण्याचे नमुने गोळा करून त्याची तपासणी केली जाते. यामध्ये पाण्याचा रंग, वास, चव, क्लोरिनची मात्रा अशा ३२ निकषांनुसार चाचणी केली जाते.गेल्या अहवालानुसार गोवंडी, चेंबूर प. येथील २.४ टक्के पाणी पिण्यास अयोग्य होते. एम. पश्चिम विभागातील २.१ टक्के आणि डोंगरी, महंमद अली रोड विभागातील २ टक्के पाणी पिण्यास अयोग्य होते, तर वांद्रे-सांताक्रुझ पूर्व येथील पाणीपुरवठ्यात कोणता दोष आढळून आला नाही.मुंबई महापालिकेमार्फत दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईस्थित तुळशी, विहार आणि ठाणे जिल्ह्यातील अप्पर वैतरणा, भातसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा धरणातून हा पाणीपुरवठा केला जातो.

टॅग्स :पाणीमुंबई महानगरपालिका