Join us
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी कामांच्या नियोजनात सुधारणा करा; आढावा बैठकीत आयुक्त भूषण गगराणी यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 05:55 IST

मुंबईत पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने, पालिकेच्या पावसाळी कामांचा गगराणी यांनी बुधवारी फेरआढावा घेतला

मुंबई : प्रतिवर्षाच्या तुलनेत मुंबईत यंदा १५ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. आगमनातच झालेल्या मुसळधार पावसाचा पालिकेच्या कामांवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः नाल्यांमधून गाळ उपसण्याच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, आता या कामांचा वेग कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये, यासाठी आधीच्या नियोजनामध्ये योग्य त्या सुधारणा कराव्यात आणि आवश्यक ते बदल करावेत. त्यातून पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये ही कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिले.

मुंबईत पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने, पालिकेच्या पावसाळी कामांचा गगराणी यांनी बुधवारी फेरआढावा घेतला. नागरी सेवा-सुविधांची सर्वोच्च प्राथमिकता लक्षात घेता पावसाळी उपाययोजनांमध्ये परिस्थितीनुरुप योग्य सुधारणा कराव्यात आणि सर्व कार्यवाहीमध्ये यंत्रणा सुसज्ज ठेवून वेगाने कामे पूर्ण करावीत. सखल व अतिसखल भागांमध्ये, जेथे पाणी साचू शकेल, अशा सर्व संभाव्य ठिकाणांवर ४१४ उदंचन संच बसविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे का, याची खातरजमा करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

रस्ते काँक्रिटीकरणातील उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत. अपूर्ण राहिलेले रस्ते मास्टिकने पूर्ण करून वाहतूकयोग्य करावेत. तसेच २४ तासांच्या आत रस्त्यावरील राडारोडा, बॅरिकेड्स आणि इतर साहित्य बाजूला करून ते गोदामांमध्ये जमा करावेत. कोणत्याही स्थितीत रस्त्यांवर वाहनाना अडथळा राहणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे,  वृक्षांची छाटणीची कामे वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी अधिकाऱ्याना सांगितले. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका