३६ दिवसांत ३९ घोषणांची अंमलबजावणी
By Admin | Updated: May 11, 2015 00:50 IST2015-05-11T00:50:18+5:302015-05-11T00:50:18+5:30
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषित प्रकल्पांची अंमलबजावणी केल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.

३६ दिवसांत ३९ घोषणांची अंमलबजावणी
मुंबई : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादर करण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषित प्रकल्पांची अंमलबजावणी केल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. ३६ दिवसांत ३९ घोषणांची अंमलबजावणी झाल्याचे रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २0१५-१६चा रेल्वे अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सादर केला. यामध्ये देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा देता येतील, अशा घोषणांचा यात समावेश होता. या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांच्याकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक वेबसाईटही तयार असून, त्याद्वारे कामकाजाचा आढावा घेतला जात आहे. रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर ३६ दिवसांत ३९ घोषणांची अंमलबजावणी करण्यात आल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाने केला आहे.
> दिल्लीतील एनआयएफटीकडून बेडरोलच्या डिझाईनवर काम सुरू.
> कोचीवेल्ली, मालदा, संत्रागच्चीमध्ये तीन नवीन रेल्वे लाँड्रीची स्थापना.
> प्रवासी हेल्पलाइन १३८ने काम करण्यास सुरुवात केली.
> सुरक्षा हेल्पलाइन १८२ प्रवाशांसाठी उपलब्ध.
> तक्रारींसंबंधी आॅनलाइन माहितीसाठी अॅप्लिकेशन आणि पोर्टल विकसित.
> पाच मिनिटांंच्या आत अनारक्षित तिकीट उपलब्ध करण्यासाठी ‘आॅपरेशन पाच मिनिट’ सेवा.
> विकलांग प्रवाशांसाठी सवलतीचे ई-तिकीट उपलब्ध करून देण्यात आले.
> हिंदीमधील ई-तिकिटींग पोर्टल तयार.
> ई-कॅटरिंग सेवा सुरू.
> टायरिंग रूमची आॅनलाइन बुकिंग.
> ट्रेनच्या आगमनाची वेळ समजण्यासाठी एसएमएस अलर्ट सेवा.
> हाउसकिपिंगसाठी नवीन विभागाची स्थापना.
> कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई-अमृतसर पंजाब मेलमध्ये डिस्पोजल बॅग बसवल्या.
> नवीन नॉन एसी डब्यात १ मेपासून कचऱ्याचे डबे बसविण्यात आले.
> मुंबई विद्यापीठात रेल्वे रिसर्च सेंटर उभारण्यासाठी सामंजस्य करार पूर्ण.
> रेल्वे डिस्प्ले नेटवर्क केंद्रीकृत करण्यात आले.
> कालका शताब्दीमध्ये करमणुकीची सोय.
> ज्येष्ठांसाठी खालच्या बर्थचा कोटा प्रति कोच २ वरून ४ वर करण्यात आला.
> सामान्य श्रेणीच्या सर्व डब्यांत मोबाइल चार्ज करण्याची सुविधा देण्याचे निर्देश.
> पाच ट्रेनचे डबे २४ वरून २६ करून घेतले.
> काकोडकर समितीने सूचित केलेल्या सुरक्षेसंदर्भातील सूचनांची माहिती घेण्यास सुरुवात.
> दिघी पोर्टशी रेल्वेची जोडणी करण्याचा निर्णयही झाला.