Join us  

Cyclone Vayu: 'वायू' वादळाचं संकट टळलं तरी मुंबईत परिणाम जाणवणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 11:18 AM

जोरदार वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडू शकतात त्यामुळे मुंबईकरांनो समुद्रकिनारी आणि झाडे असतील अशा परिसरापासून लांब राहा

मुंबई - वायू चक्रीवादळ जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असलं तरी मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये तसेच झाडांखाली उभं राहू नये कारण वायू वादळाचं संकट टळलं असलं तरी त्याचा परिणाम मुंबईत जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. 

मुंबई हवामान विभागाचे संचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितल्यानुसार, वायू चक्रीवादळ सध्या मुंबईच्या दक्षिण किनारपट्टीपासून 280 किमी अंतरावर धडकलं आहे. हे वादळ 110-135 किमी प्रतिवेगाने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. मात्र या वादळामुळे महाराष्ट्राच्या उत्तर समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा वाहणार आहे. समुद्रकिनारी लोकांनी जाऊ नये अशी खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. तसेच मच्छिमारांनीही समुद्रात प्रवेश करु नये अशा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडू शकतात त्यामुळे मुंबईकरांनो समुद्रकिनारी आणि झाडे असतील अशा परिसरापासून लांब राहा असा इशारा मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

चक्रीवादळाने हवामानात महत्त्वपूर्ण बदल झाले असून याचा परिणाम म्हणून मुंबईत १५ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचे श्रेय कमी दाबाच्या क्षेत्राला जात असून हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे मुंबई आणि उपनगरात पूर्व मान्सूनच्या पावसाचा लपंडाव पुढील काही दिवस सुरू राहील. १२ जून रोजी मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. तसेच १५ जूनच्या आसपास पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे.

मुंबईत दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस११ आणि १२ जून रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पाऊस पडेल. तसेच ११, १२ आणि १३ जून रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

वायू चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर अशा परिसरांना बसू शकतो. सौराष्ट परिसरातील 10 जिल्ह्यामधील 408 गावांमध्ये राहणाऱ्या 60 लाख लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. रेस्क्यू ऑपरेशनसाठी राज्य सरकारकडून लष्कराच्या 10 तुकड्या पश्चिम किनाऱ्यांवर तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच एनडीआरएफ टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे.  

टॅग्स :वायू चक्रीवादळमुंबईहवामान