जनजागृतीमुळे फटाक्यांच्या विक्रीवर परिणाम

By Admin | Updated: October 23, 2014 02:01 IST2014-10-23T02:01:25+5:302014-10-23T02:01:25+5:30

धडम...धूम... असा फटाक्यांचा आवाज दिवाळीत परिचित असतो. पण यंदा मात्र चित्र थोडे पालटलेले आहे. एरवी फटाक्यांतून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे सामान्यांना घाम फुटतो,

The impact of public awareness on the sale of crackers | जनजागृतीमुळे फटाक्यांच्या विक्रीवर परिणाम

जनजागृतीमुळे फटाक्यांच्या विक्रीवर परिणाम

महेश बाफना, मुंबई
धडम...धूम... असा फटाक्यांचा आवाज दिवाळीत परिचित असतो. पण यंदा मात्र चित्र थोडे पालटलेले आहे. एरवी फटाक्यांतून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे सामान्यांना घाम फुटतो, पण यंदा मात्र फटाक्यांची विक्री मंदावल्याने फटाके विक्रेत्यांनाच घाम फुटला आहे. जनजागृतीमुळे आणि आचारसंहिता दिवाळीच्या अवघ्या दोन-तीन दिवस आधी संपल्याने फटाके विक्रीवर याचा मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे.
सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, वर्तमानपत्रे, टीव्हीवरील जाहिराती, पथनाट्य, माऊथ - टू - माऊथ पब्लिसिटी यामुळे लोकांमध्ये पर्यावरणाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याने फटाक्यांची दुकाने लावण्यास बंदी होती. यामुळे यंदा विक्रेत्यांना २० आॅक्टोबरपासून फटाक्यांची दुकाने थाटता आली.
यंदा फटाक्यांच्या किमतीतदेखील तब्बल १० ते १२ टक्के वाढ झाली आहे. ही भाववाढ अनेकांना परवडणारी नाही. त्यामुळे याचादेखील परिणाम बाजारपेठेत जाणवत आहे. स्थिती अशी आहे की, अनेक खरेदीदार फक्त भाव ऐकूनच दुकानातून काढता पाय घेत आहे.
या सगळ्या गोष्टींमुळे अनेक दुकानांत गेल्या वर्षीसारखा फटाके खरेदीचा उत्साह दिसून येत नाही. पण तरीही लहान मुलांचा हट्ट पुरवत थोडीफार फटाक्यांची विक्री होताना दिसत आहे. पण यंदा जनतेत पर्यावरणाविषयी झालेल्या जनजागृतीमुळे फटाके खरोखर कमी फुटतील की ती मागणी तशीच राहणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. पण लोकांमध्ये पर्यावरणाविषयी आलेली जनजागृती स्वागतार्ह आणि कौतुकास्पद आहे हे मात्र नक्कीच !

Web Title: The impact of public awareness on the sale of crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.