क्षेत्रफळाचा घोळ रहिवाशांच्या मुळावर

By Admin | Updated: June 30, 2015 01:18 IST2015-06-30T01:18:35+5:302015-06-30T01:18:35+5:30

सिडकोच्या नियोजन विभागाच्या ढिसाळ करभाराचा फटका नेरूळ येथील दत्तगुरू सोसायटीतील रहिवाशांना बसला आहे. सोसायटीच्या कंडोनियम प्लॉटच्या प्रत्यक्ष असणाऱ्या क्षेत्रफळापेक्षा

The impact of the area on the residents of the area | क्षेत्रफळाचा घोळ रहिवाशांच्या मुळावर

क्षेत्रफळाचा घोळ रहिवाशांच्या मुळावर

नवी मुंबई : सिडकोच्या नियोजन विभागाच्या ढिसाळ करभाराचा फटका नेरूळ येथील दत्तगुरू सोसायटीतील रहिवाशांना बसला आहे. सोसायटीच्या कंडोनियम प्लॉटच्या प्रत्यक्ष असणाऱ्या क्षेत्रफळापेक्षा सिडको दप्तरी कमी क्षेत्रफळाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सोसायटीतील दोन्ही इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. अशा स्थिती इमारतींची पुनर्बांधणी करणे गरजेचे झाले आहे. मात्र कंडोनियम प्लॉटच्या क्षेत्रफळाचा घोळ निर्माण
झाल्याने पुनर्बांधणीचा प्रश्नही अधांतरी राहिला आहे. याचा परिणामी येथे राहणाऱ्या १३६ कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे.
सिडकोने १९८७मध्ये डिमाण्ड रजिस्ट्रेशन स्कीम अर्थात डीआरएस योजनेअंतर्गत नेरूळ सेक्टर ६ मध्ये ए-१ आणि ए-२ टाईपच्या दोन इमारती बांधल्या आहेत. या दोन्ही इमारतीत एकूण १३६ सदनिका आहेत. यातील बहुतांशी रहिवासी अल्प व मध्यम उत्पन्न गटात मोडणारे आहेत. विशेष म्हणजे एका इमारतीचा बिल्टअप एरिया (प्रत्यक्ष क्षेत्रफळ) ११८0 चौरस मीटर आहे. त्याप्रमाणे दोन इमारतींचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ २३६0 चौरस मीटर इतके असणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र हे क्षेत्रफळ १९६६ चौरस मीटर इतके नोंदविले गेले आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे देय असलेले उर्वरित ३९४ चौरस मीटर क्षेत्र
कंडोनियम प्लॉटमध्ये समाविष्ट करावे, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. या मागणीसाठी सोसायटीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सिडकोकडे पाठपुरावा सुरू आहे.
या कंडोनियम दुरुस्तीसाठी सिडकोने सूचित केल्याप्रमाणे रहिवाशांनी महापालिकेकडून ना हरकतही मिळविली आहे. त्यानंतरही परिस्थिती जैसे थे असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे महापालिकेने सात वर्षांपूर्वी या दोन्ही इमारती धोकादायक घोषित केल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर या इमारतीतील रहिवाशांना नोटिसा बजावल्या जातात. मात्र या इमारतीच्या डागडुजीबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही. आता तर या इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे.

शासनाने सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआयची घोषणा केली आहे. त्यानुसार सदर इमारतींची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे. मात्र सिडकोच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांचे जीव टांगणीला लागले आहेत.

गरज तातडीने पुनर्बांधणीची
इमारतींच्या कंडोनियम प्लानमध्ये दुरुस्ती होणे गरजेचे आहे. सिडकोच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने सिडकोने तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी दत्तगुरू सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र बागल यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी सिडकोचे मुख्य नियोजनकार एम.डी. लेले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: The impact of the area on the residents of the area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.