Join us  

अनैतिक संबंध बेतले बिझनेस पार्टनरच्या जीवावर; पोलीस तपासात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 4:10 AM

मालाडमध्ये दागिन्यांच्या कारखान्यात मितेश सोनी या सोनाराचा मृतदेह आढळला होता. बारबालेवर पैसे उडविण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याची हत्या त्याचा माजी बिझनेस पार्टनर हेमंत सोनी याने केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुंबई : मालाडमध्ये दागिन्यांच्या कारखान्यात मितेश सोनी या सोनाराचा मृतदेह आढळला होता. बारबालेवर पैसे उडविण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याची हत्या त्याचा माजी बिझनेस पार्टनर हेमंत सोनी याने केल्याचे तपासात उघड झाले आहे. यात बारबालेच्या भूमिकेबाबत पोलीस तपास करीत आहेत.हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सोनी याचे साकिनाक्यात एका बारमध्ये काम करणाऱ्या मुलीसोबत संबंध होते. त्याच्या कारखान्यात काम करून मिळालेला पैसा त्याने तिच्यावरच उडवला होता. तसेच यासाठी त्याने सख्ख्या भावासह अनेकांकडून पैसे उधार घेतले होते. मात्र ते वेळीच परत न करू शकल्याने तो कर्जबाजारी झाला. त्यामुळे त्याला तीन महिन्यांपूर्वी कारखाना बंद करावा लागला. मात्र बारबालेचा नाद त्याने सोडला नव्हता.मृत नितेश हा सोनीचा बिझनेस पार्टनर होता. मुंबईत आल्यावर त्यांनी एकत्र कारखाना सुरू केला. मात्र सोनी याच्या अनैतिक संबंधाबाबत त्याला समजले आणि तो त्याच्यापासून वेगळा झाला.नितेशने याबाबत सोनीच्या पत्नीलादेखील सांगितले. त्यामुळे त्यांच्यात यावरून वाद झाले आणि ती त्याला सोडून राजस्थानला निघून गेली. याचा राग सोनीच्या मनात होता. तसेच नितेशकडे सोन्याच्या दागिन्यांची मोठी आॅर्डर आल्याचेही त्याला समजले होते. त्यामुळेच नितेशला मारून त्याच्याकडचे सोने आणि पैसे घेऊन पळ काढण्याचा कट त्याने रचला.सर्व बाबींची माहिती घेऊन नियोजनानुसार शनिवारी धारदार शस्त्राने त्याची हत्या करीत लाखो रुपयांचे दागिने आणि साडेपाच लाखांची रोख रक्कम घेऊन सोनी पसार झाला.ही बाब उघडकीस आली तेव्हा परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, साहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे आणि दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पवार, मनोहर शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव, मच्छिंद्र जाधव, आरे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अवधूत वाडेकर, वनराई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जिनपाल वाघमारे या पथकाला त्याच्या शोधार्थ विविध ठिकाणी रवाना केले आणि अखेर राजस्थानमध्ये सोनी त्यांना सापडला.

टॅग्स :गुन्हेगारी