अनैतिक संबंध...वाद... अन् हत्यासत्र...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:07 IST2021-09-22T04:07:34+5:302021-09-22T04:07:34+5:30
गेल्या ८ महिन्यांत मुंबईत १०९ हत्येच्या घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या ८ महिन्यांत मुंबईत हत्येच्या १०९ घटनांची ...

अनैतिक संबंध...वाद... अन् हत्यासत्र...
गेल्या ८ महिन्यांत मुंबईत १०९ हत्येच्या घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या ८ महिन्यांत मुंबईत हत्येच्या १०९ घटनांची नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे. पैसे, अनैतिक संबंधाबरोबर पूर्व वैमनस्यातून मुंबईत एकापाठोपाठ एक हत्यासत्राबरोबर क्षुल्लक वादातून झालेल्या हत्येच्या घटनांची यात भर पडली आहे.
या घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी राज्यात २ हजार १६३ हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये ५६४ महिलांचा समावेश आहे. प्रेमप्रकरणांतून ११६ तर अनैतिक संबंधातून १८३ जणींची हत्या करण्यात आली आहे. महिला हुंडाबळीच्याही शिकार झाल्याचे दाखल घटनांवरून दिसून येत आहे.
त्यातच गेल्या ८ महिन्यांत मुंबईत १०९ हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे. यापैकी १०६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. गेल्या वर्षी याच ८ महिन्यांत ९२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी ८५ गुन्ह्यांचा उलगडा करण्यास पथकाला यश आले होते.
.....
हत्या करत घरातच पुरले मृतदेह...
२० ऑगस्ट : भाऊजीची हत्या करत घरातच पुरला मृतदेह
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दीपक उर्फ कोत्या जगन्नाथ सांगळे (२८) या भाऊजीच्या अत्याचाराला त्रासलेल्या मेहुण्याने त्याच्या बहीण, भाऊ तसेच मित्रांच्या मदतीने त्याची १५ जून रोजी हत्या करीत घरातच मृतदेह पुरल्याच्या धक्कादायक घटनेचा दोन महिन्यांनी उलगडा झाला. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
.....
चिमुकलीमुळे उलगडले ‘दृश्यम’कांड
२ जून : “साहेब, माझे पती हरविले,” अशी तक्रार घेऊन विवाहितेने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनीही तत्काळ शेजारी, नातेवाइकांसह मित्र-मंडळीकडे शोध सुरू केला. तपास सुरू असताना ११ दिवसांनी ६ वर्षांच्या मुलीने वडील हरविले नाही. त्यांची आईनेच २२ मे रोजी हत्या करीत मृतदेहाचे तुकडे किचनमध्ये पुरल्याचे सांगितले. पोलिसांनी किचनमध्ये धाव घेत तीन फूट खोल खड्डा खोदला असता मृतदेहाचे तुकडे मिळून आले. ‘दृश्यम’ सिनेमातील दृश्याप्रमाणे घडलेल्या या थरारक नाट्याचा मुलीमुळे पर्दाफाश झाला. ही धक्कादायक घटना दहिसरमध्ये उघडकीस आली होती.
.....