Join us  

शब्द पाळणारा नेता ही प्रतिमा सर्वत्र पोहोचेल - प्रकाश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 12:07 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला आहे.

प्रकाश महाजन, प्रवक्ते, मनसे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तरुणांच्या मनावर गारुड असणारे, मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेणारे नेते असून त्यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याचा फायदा निश्चितच महायुतीला होणार आहे. पक्षाची संघटना, कार्यकर्ते आणि ज्या मूल्यांवर पक्ष उभा आहे त्यांचा विचार करूनच राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. देशात हिंदू धर्माला प्राधान्य मिळावे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, महाराष्ट्रात उद्योग यावेत, त्याचबरोबर राज्याचे मूलभूत प्रश्न सुटावेत ही अपेक्षा समोर ठेवून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. या प्रमुख नेत्यांना राज ठाकरे यांचे महत्त्व पटले आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे पारडे जड झाले आहे. रस्त्यावर उतरून जनतेसाठी संघर्ष करणारा एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी मनसेने कायम आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, कोकण याबरोबरच महाराष्ट्राच्या अन्य ग्रामीण भागात राज ठाकरे यांचा करिष्मा कायम आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. पाठिंब्यानंतर लोकांच्या या भावना महायुतीला मिळणाऱ्या मतामध्ये रूपांतरित होणार आहेत. महायुतीला मिळणारी मते आणि मनसेला मिळणारी मते यांची गोळाबेरीज झाली तर शिंदेसेना, भाजप तसेच अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त होणार आहे.  

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  कार्यकर्ते घराघरात पक्षाचा विचार पोहोचवणार आहेत. लोकसभेपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याचाच लाभ आमच्या पक्षाला होणार असून त्यावेळी जी पक्षहिताची भूमिका राज ठाकरे घेतील ती सर्व कार्यकर्ते मान्य करतील. राज ठाकरे कोणताही स्वार्थ मनात न ठेवता दिलेला शब्द पाळतो, हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून घराघरात पोहोचणार आहे.

मनसे फॅक्टर लोकसभा निवडणुकीत चालणारच. या फॅक्टरमुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनात भीतीचा गोळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ते मनसेत नाराजी असल्याच्या अफवा पसरवत आहेत. मात्र मनसे कार्यकर्त्यांचा आपल्या नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे. या पाठिंब्यामागचा राज ठाकरे यांचा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवूनच महायुतीतील पक्षांच्या खांद्याला खांदा लावून मनसे कार्यकर्ते प्रचारात उतरतील. आदेशाचे तंतोतंत पालन करून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी काम करतील.

टॅग्स :राज ठाकरेमनसे