स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन चित्रण
By Admin | Updated: October 23, 2014 23:15 IST2014-10-23T23:15:43+5:302014-10-23T23:15:43+5:30
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान दिलेल्या व्यक्ती विस्मरणात जातात की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे

स्वातंत्र्यसैनिकांचे जीवन चित्रण
मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान दिलेल्या व्यक्ती विस्मरणात जातात की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. तर दुस-या बाजूला इतिहासाच्या पुनर्लेखनाचा पद्धतशीर उपक्रम हाती घेण्यात आला. अशा संक्रमणावस्थेत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या खऱ्या इतिहासाचे व त्या लढ्याने दिलेल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याच्या दृष्टीने पत्रकार संजय चिटणीस यांचे 'राजकीय खटल्यातील थोर व्यक्ती’ हे पुस्तक खरोखर मोलाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत डॉ. भालचंद्र कानगो यांनी काढले.
पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय चळवळी, खटले आणि चळवळीचे नेते व पुस्तकाचा विषय असलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील राजकीय नेते आणि चळवळी यांचा तुलनात्मक आढावा केतकर यांनी घेतला.
या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तीवरील प्रकरण म्हणजे स्वराज्य व त्याच्याशी निगडित उच्च मानवी मूल्यांसाठी त्या त्या व्यक्तींनी केलेल्या संघर्षाचे, त्यागाचे चित्रण आहे. तसेच खटल्यांमधील विविधता मनोरंजक आहे, असे सांगून केतकर म्हणाले की, काही खटले न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल होते. काही सत्याचा आग्रह धरल्याबद्दल होते. काही राजद्रोहाच्या आरोपावरून होते. तर काही हिंसात्मक कारवाया केल्याबद्दल होते. निरनिराळ्या व्यक्तींवरील प्रकरणांतून त्या मंतरलेल्या दिवसांचे जिवंत चित्रण करण्यात चिटणीस यशस्वी झाले.
ज्येष्ठ पत्रकार रमेश झंवर म्हणाले, माणूस म्हणून जगताना स्वातंत्र्य आणि स्वराज्य या नितांत गरजा कशा आहेत, याचे वस्तुपाठ समाजाला देणा-या ख-याखु-या स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनाचे हे चित्रण
आहे.
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणाले, या सर्व खटल्यांमधील व्यक्ती विविध पार्श्वभूमी असलेल्या विविध क्षेत्रांमधील होत्या. पण त्यांचे लक्ष एकच असल्याने त्यांच्या वागण्या-बोलण्यात सच्चेपणा होता. या पुस्तकात नेत्यांवर भरल्या गेलेल्या राजकीय खटल्यांची केवळ जंत्री नसून त्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर समाजामध्ये उत्स्फूर्तपणे व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांची बहारदार गुंफण या पुस्तकात वाचायला मिळते. तटस्थ वृत्तीने पुस्तकाचे लेखन केल्याने प्रत्येक नेत्याच्या राजकीय-सामाजिक मतांचा परिचय होतो. त्याचबरोबर त्या मतांवर संजय चिटणीस यांनी शैलीदार टीकाटिप्पणी केल्याने पुस्तक रोचक झाले आहे, या संदर्भात नेहरूंवरील प्रकरणात काश्मीरचा प्रश्न, ३७०वे कलम यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर
चिटणीस यांनी केलेले भाष्य म्हणजे नेहरूंच्या टीकाकारांना चोख उत्तर
आहे.
संजय चिटणीस म्हणाले की, ‘३५ वर्षांच्या पत्रकारितेची फलश्रुती म्हणजे हे पुस्तक आहे, असे मी मानतो’. त्याचवेळी पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात ज्या पत्रकारांनी प्रोत्साहन दिले त्यांचा चिटणीस यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.(प्रतिनिधी)