धनारे यांनी पकडली दापचरीत अवैध वाहने

By Admin | Updated: May 9, 2015 22:59 IST2015-05-09T22:59:01+5:302015-05-09T22:59:01+5:30

दापचरी तपासणी नाक्यावर अवैध अवजड वाहने तसेच परप्रांतीय टोळ्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले

Illegal vehicles caught by Dhanare | धनारे यांनी पकडली दापचरीत अवैध वाहने

धनारे यांनी पकडली दापचरीत अवैध वाहने

तलासरी : दापचरी तपासणी नाक्यावर अवैध अवजड वाहने तसेच परप्रांतीय टोळ्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून त्यांनी आमदार पास्कल धनारे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी नाक्यावर जाऊन अवैध चालणारी वाहने पकडली. एवढेच नाहीतर अधिकाऱ्यांना बोलवून खडसावले. येथील बोगस कारभाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
येथे अनेक परप्रांतीय गुंडांच्या टोळ्या कार्यरत असल्याने नाका व परिसर सध्या संवेदनशील बनला आहे. याबाबत, ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यानंतर आमदार धनारे यांनी कारवाईसाठी संबंधितांना सांगितले. मात्र, यंत्रणेने जोपासलेल्या टोळ्यांच्या मुसक्या बांधणे कठीण झाल्याने अखेर त्यांनी स्वत: नाक्यावर जाऊन अवैध चालणारी वाहने अडवित आरटीओ आणि सद्भाव व्यवस्थापनाला कारवाईस भाग पाडले. नाक्याची व्यवस्था पाहणारी सद्भाव कंपनी व आरटीओ अधिकाऱ्यांच्या संगनमताने या नाक्यावर अवैध वाहने पास केली जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
तपासणी नाक्यावर अवजड वाहने पास करणाऱ्या टोळ्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गांभीर्य ओळखून तहसीलदार गणेश सांगळे, उपविभागीय अधिकारी अंजली भोसले, डहाणूच्या तहसीलदार तसेच तलासरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी आमदार धनारे व ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
दापचरी तपासणी नाक्यावर शासकीय यंत्रणेनेच जोपासलेल्या टोळ्या सध्या डोईजड झाल्या आहेत. या टोळ्या सध्या कोणालाच जुमानत नसून दिवसरात्र त्यांच्या माध्यमातून अवैधपणे अवजड वाहने चालत आहेत. परिणामी, शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. अवैध वाहनांमुळे येथे अनेक वेळा अपघात होत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal vehicles caught by Dhanare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.