अवैध प्रवासी वाहतुकीचे बोईसरला थैमान
By Admin | Updated: January 23, 2015 23:30 IST2015-01-23T23:30:11+5:302015-01-23T23:30:11+5:30
बोईसर शहरामध्ये सुमारे पंधराशे तीन आसनी रिक्षा असून त्यांचे चालक हे बोईसर शहरासह तसेच तारापूर एमआयडीसी व परिसरात रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

अवैध प्रवासी वाहतुकीचे बोईसरला थैमान
बोईसर : बोईसर शहरामध्ये सुमारे पंधराशे तीन आसनी रिक्षा असून त्यांचे चालक हे बोईसर शहरासह तसेच तारापूर एमआयडीसी व परिसरात रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु वाहतूक पोलीसांच्या आर्थिक संगनमताने अनधिकृत वाहनांतून अवैधपणे प्रवासी वाहतूक होत असल्याने त्यांचा गंभीर परिणाम अधिकृत रिक्षाचालकांवर होत असल्याचा आरोप सेनाप्रणीत रिक्षा युनीयनने केला असून अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना प्रणीत रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, चालक-मालक सेवाभावी संस्थेमार्फत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात बोईसर शहरामध्ये अनधिकृत मिनिडोअर प्रायव्हेट जिप, टाटा मॅजिक व मुंबईहून वाद झालेल्या बसेस या गाड्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकृत थांबे नसतानाही निव्वळ वाहतूक पोलीसांच्या आर्थिक संगनमताने राजरोसपणे पोलीसांच्या समोरच अवैध प्रवासी वाहतूक करीत असून त्या विरोधात वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्याचे नमूद करून वरीष्ठांकडे तक्रार केल्यानंतर उलटपक्षी वाहतूक पोलीस हे आकसाने अधिकृत रिक्षाचालकांवर जाणून-बुजून खोट्या कारवाई करून २०० ते ५०० रू. ची जबरदस्तीने पावती फाडण्यास भाग पडतात असा आरोप करण्यात आला आहे.
तर दोन दोन वर्षे तेच वाहतूक पोलीस असल्याकारणाने अनधिकृत वाहनांचे मालक व त्यांचे आर्थिक हितसंंबंध मजबूत झाल्याने वाहतूक पोलीसांचा वचक राहिला नसल्याचा आरोप करून वर्षानुवर्षे एका जागेवर असलेल्या वाहतूक पोलीसांची बदली करण्याचीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे. तर पंधराशे तीन आसनी रिक्षा चालकांमधील १०० ते १५० रिक्षा चालकांकडे प्रवासी वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना (लायसन) व बॅच नसून ते रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारून कुठेही रिक्षा थांबवून बेशिस्तपणे अनधिकृत व्यवसाय करतात. त्यापैकी काही रिक्षाचालक हे मद्यप्राशन, गांज्या, चरसची नशा करून क्षुल्लक कारणांवरून प्रवाशांशी हुज्जत घालून नाहक वाहतुक ठप्प करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
(वार्ताहर)
४अनधिकृत मिनिडोअर प्रायव्हेट जिप,
टाटा मॅजिक व मुंबईहून वाद झालेल्या बसेस या गाड्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकृत थांबे नसतानाही निव्वळ वाहतूक पोलीसांच्या आर्थिक संगनमताने राजरोसपणे पोलीसांच्या समोरच अवैध प्रवासी वाहतूकीचा शहरात सुळसुळाट झाला आहे.