मुरबे येथील रेतीची बेकायदा वाहतूक सुरूच

By Admin | Updated: May 31, 2014 00:57 IST2014-05-31T00:57:23+5:302014-05-31T00:57:23+5:30

बोईसर येथील मुरबे खाडीतून दिवसाढवळ्या प्रचंड रेती उपसा सुरू असून येथील हजारो ब्रास रेतीची दिवसभर चिंचणी, वरोर, वाणगांव, डहाणे येथे बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे

The illegal trade of sand in Mbebah | मुरबे येथील रेतीची बेकायदा वाहतूक सुरूच

मुरबे येथील रेतीची बेकायदा वाहतूक सुरूच

डहाणू : बोईसर येथील मुरबे खाडीतून दिवसाढवळ्या प्रचंड रेती उपसा सुरू असून येथील हजारो ब्रास रेतीची दिवसभर चिंचणी, वरोर, वाणगांव, डहाणे येथे बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. मात्र याकडे तलाठी, सर्कल, पोलीस तसेच महसूल अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. ठाणे जिल्ह्यात रेती उत्खनन करणे, वाहतूक करणे यावर बंदी असल्याने सध्या रेतीचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे पोलीस तसेच महसूल यंत्रणेला हाताशी धरुन काही रेती माफियांनी तालुकाभरात चढ्या भावाने रेती पुरवठा सुरू केला आहे. बांधकामासाठी गुजरातच्या रेतीचे भाव पंधरा हजार रुपये घेतले जात आहेत, तर मुरबे येथील खाडीची रेती अकरा हजार रुपयेप्रमाणे पाहिजे तिथे पोहोच केली जात आहे. विशेष म्हणजे संजाण, मरोली, दुधळी येथील रेतीचा साठा बोर्डी येथे केला जात आहे. तिथून सर्वत्र पाठविली जात आहे. तर मुरब्या खाडीची रेती दिवसाढवळ्या चिंचणी, तारापूर सागरी महामार्गावरून परिसरातील गावात बिनधास्त सप्लाय केली जात आहे. दरम्यान, मुरबे खाडीतून दिवसभरात पंधरा ते वीस ट्रक बेकायदेशीर रेती डहाणूत येत असून संबंधित शासकीय यंत्रणा निष्क्रिय झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत डहाणूचे तहसीलदार यांना विचारले असता त्यांनी चिंचणी येथे दिवस रात्र भरारी पथकाची नेमणूक करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)

Web Title: The illegal trade of sand in Mbebah