Join us  

म्हसळा आंबेत खाडीत अवैधरीत्या रेतीचे उत्खनन; लाखो रुपयांच्या महसुलाची लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:52 PM

रेती उत्खनन करीत असलेले परराज्यातील कामगार गर्दी करून दाटीवाटीने काम करीत आहेत.

मुंबई : म्हसळा : रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवून, म्हसळा आंबेत खाडी पात्रात हातपाटीच्या नावाखाली रेतीच्या संक्शन पंपाने भरमसाट उत्खनन करून शासकीय महसुलाची लूट करण्यात येत आहे.

आंबेत येथे हातपाटीच्या साहाय्याने रेतीचे उत्खनन करायला रायगड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे, असे असताना गोरेगाव-आंबेत पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत संक्शन पंपाने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन व वाहतूक करण्यात येत आहे.लॉकडाऊनचे सर्व नियम धाब्यावर बसवून म्हसळा तालुक्यातील आंबेत खाडी पात्रातून हातपाटीच्या नावाखाली पोलिसांच्या नजरेसमोरच हजारो ब्रास रेतीचे उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. शासनाने मजुरांची उपासमारी होऊ नये, यासाठी काही प्रमाणात हातपाटी व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची मशीन न वापरता आणि कमीतकमी मजुरांच्या मदतीने रेतीउपसा करण्यास परवानगी दिली आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करू नये, मास्क लावून काम करणे व अन्य बाबींची दक्षता घेणे आवश्यक असताना, येथे या नियमांना मूठमाती देऊन केवळ ‘दाम करी काम’ या गोष्टीला महत्त्व दिले गेले आहे. परराज्यातील अनेक मजूर सुरक्षित अंतर न ठेवता, एकाच वेळेस रेती उत्खनन व रेती डंप करण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहेत.

रेती उत्खनन करीत असलेले परराज्यातील कामगार गर्दी करून दाटीवाटीने काम करीत आहेत, अशाने कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेती डम्पिंग ठिकाणी गाडीत रेती लोड करण्यासाठी अनेक ट्रक ये-जा करतात. सद्यस्थितीत सर्वत्र रेतीचे उत्खनन बंद असताना, ठेकेदार मात्र चढ्या दराने रेतीविक्री करून आपला खिसा भरत आहेत. त्यामुळे कारवाईची मागणी होत आहे.आंबेत पोलीस चेकपोष्ट ते आंबेत पुलाचे शेजारीच होत असलेले रेती उत्खनन केवळ १०० ते १५० मीटरच्या अंतरावर आहे.

या ठिकाणी गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील तीन पोलीस कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत असताना, त्यांंचेही ही बाब कशी काय निदर्शनास येत नाही, हे नवलच आहे. पोलिसांच्या आणि महसुली अधिकारी यांच्या डोळ्यादेखत रोजच कितीतरी मालवाहतूक गाड्यांमधून शासन नियमांचे उल्लंघन करून राजरोसपणे रेती वाहतूक होत असताना, कोणतीच कार्यवाही केली जात नाही, हा मोठा गहन प्रश्न आहे.

टॅग्स :शेतकरीमुंबईकोरोना वायरस बातम्या