बेकायदा पार्कींग; नौपाडाकर हैराण
By Admin | Updated: February 13, 2015 22:41 IST2015-02-13T22:41:34+5:302015-02-13T22:41:34+5:30
ठाण्यातील नौपाडा परिसर हा अतिशय महत्वाचा म्हणून ३८ नं. प्रभागाकडे या प्रभागाकडे पाहिले जात आहे. तो विकसित म्हणून ओळखला जातो

बेकायदा पार्कींग; नौपाडाकर हैराण
अजित मांडके, ठाणे
ठाण्यातील नौपाडा परिसर हा अतिशय महत्वाचा म्हणून ३८ नं. प्रभागाकडे या प्रभागाकडे पाहिले जात आहे. तो विकसित म्हणून ओळखला जातो. पाणी, पायवाटा, रस्ते आदी समस्या नसल्या तरी या भागातील हरिनिवास सर्कल, नौपाडा, सरस्वती शाळा, मल्हार सिनेमा या भागात होणारी बेकायदेशीर पार्कींग आणि वाहतूक कोंडी यामुळे येथील नागरीक हैराण झाले आहेत.
या प्रभागात भास्कर कॉलनी, रवी कंपाऊंड, हरिनिवास, रामवाडी, दमाणी इस्टेट, वडार वाडी, प्रशांत नगर, वंदना सिनेमाचा काही भाग, पाचपाखाडी परिसरातील काही भाग आदींचा समावेश होत आहे. या प्रभागाची लोकसंख्या १९ हजारांच्या घरात असून दिनदयाळ नगर, वाडरवाडी आदी भागातील रहिवाशांचा पुर्नवसनचा मुद्दा आजही रखडलेला आहे. चिखलवाडी भागातील रहिवाशांच्या घरात मागील वर्षी, ड्रेनेज लाईनचे पाणी घरात शिरल्याचा प्रकार घडला होता. परंतु ही वाहीनी दुरुस्त करण्यात आली असून, आता ही समस्या सुटली असली ही वस्ती खालील बाजूस असल्याने येथे पावसाळ्यात पाणी साचल्याच्या घटना घडतात. याशिवाय वडार वाडी भागातील रहिवाशांचे पुनर्वसनाचा मुद्दा मागील चार वर्षापासून काहीसा रखडलेला आहे. या भागात ३० ते ३५ वर्षे जुन्या इमारतींचा मुद्दा देखील आ वासून उभा आहे. या इमारती मोडकळीस आल्या असून केवळ एफएसआयच्या मुद्यावरुन या इमारतींची दुरुस्ती होऊ शकलेली नाही. याच प्रभागात नौपाडा प्रभाग समिती कार्यालय असून, या कार्यालयाची अवस्था देखील दयनीय झाली आहे. येथे मार्केटचे आरक्षण असतांना त्याठिकाणी प्रभाग समिती कार्यालय आणि इतर गाळे आहेत. याशिवाय समोरील भागात देखील पालिकेचे आरक्षण आहे. याठिकाणी पार्कींग प्लाझा तयार करण्याचा पालिकेचा मानस आहे. परंतु ही जागा अद्यापही पालिकेला मिळविता आलेली नाही. प्रभागात एकमेव छोटेसे उद्यान आहे. त्याशिवाय उद्यान नाही, मैदान असून देखील त्याची परिस्थिती हालाखीची आहे. परंतु येथील रस्त्यांची अवस्था चांगली असून, ड्रेनेज लाईनचे कामही जवळ जवळ झालेले आहे. या प्रभागातून जाणारे रस्ते हे पुढे जाऊन हायवेला मिळतात. त्यामुळे या भागात वाहनांची ये जा दिवस रात्र सुरुच असते. असे असले तरी पालिकेचे पार्कींग धोरण अद्याप लागू न झाल्याने त्याचा गैरफायदा येथे सुरु आहे. नौपाडा, भास्कर कॉलनी, हरिनिवास सर्कल, आदींसह इतर महत्वाच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा पार्कींग होत आहे. आधीचे हे रस्ते छोटे आहेत. त्यात दोन्ही बाजूने पार्कींग झाल्याने येथे वाहतुक कोंडीही होत आहे. या संदर्भात वांरवार तक्रार करुनही कारवाई होत नसल्याचे मत येथील रहिवासी व्यक्त करतात. याशिवाय या भागात सोनसाखळी चोरीच्या घटना देखील अधिक प्रमाणात होत आहेत.