Join us

भर निवडणुकीत वरळी आणि अंधेरीत अवैध दारूची आयात; महागड्या विदेशी स्कॉच मद्यासह ३३ लाखाचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 19:28 IST

उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर अधीक्षक प्रवीण तांबे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी वरळी येथे कारवाई केली. 

श्रीकांत जाधव

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात परदेशातील महागड्या बॅन्डच्या विदेशी मद्याची दिल्ली येथून मुंबई अवैध वाहतूक करणाऱ्यांवर सोमवारी मुंबई शहर भरारी पथकाने कारवाई केली. या कारवाईत वरळी आणि अंधेरी येथे छापा टाकून एकूण ३७ लाख २८ हजार ५६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची अधिक चौकशी निवडणूक आयोगाकडून केली जाण्याची शक्यता आहे. 

उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहर अधीक्षक प्रवीण तांबे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी वरळी येथे कारवाई केली. 

परदेशात तयार करण्यात आलेली व दिल्ली येथून मुंबईत आणलेल्या विविध महागड्या बॅन्डच्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर शहर भरारी पथक २ याना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून वरळी गाव येथील सफेलो हॉटेल समोर एका वाहनावर कारवाई केली. 

या कारवाईत महागड्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्या, एक चारचाकी वाहनासह एकूण २२ लाख ८९ हजार ४०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील अटक आरोपी सतीश शिवलाल पटेल याने दिलेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिम येथे लोखंडवाला कॉम्लेक्समध्ये छापा मारुन १४ लाख ३९ हजार १६० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अशा दोन्ही कारवाईत एकूण ३७ लाख २८ हजार ५६० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत भरारी पथक क्र. २ चे निरीक्षक प्रकाश काळे, दु.निरीक्षक प्रज्ञा राणे, लक्ष्मण लांघी तसेच जवान विनोद अहीरे सहभागी झाले होते. सदर गुन्ह्याचा तपास निरीक्षक काळे करीत आहेत.