राज्यात दुचाकींवरून बेकायदेशीर मालवाहतूक
By Admin | Updated: May 13, 2014 03:31 IST2014-05-13T03:31:46+5:302014-05-13T03:31:46+5:30
प्रवासी वाहन म्हणून नोंदणी करून अनेक दुचाकी वाहने मालवाहतूक करीत असल्याने राज्याचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यात दुचाकींवरून बेकायदेशीर मालवाहतूक
मुंबई : प्रवासी वाहन म्हणून नोंदणी करून अनेक दुचाकी वाहने मालवाहतूक करीत असल्याने राज्याचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे या दुचाकींवर आरटीओकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. डॉमिनोज, केएफसी, मॅक्डोनल्ड, पिझ्झा हर्ट, गार्शिया आदी खाद्यपदार्थ विक्रेत्या कंपन्यांकडून आपले पदार्थ घरपोच देण्यासाठी किंवा इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात दुचाकींचा वापर करतात. मात्र हा वापर करताना त्यांच्याकडून परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. केंद्राच्या आदेशानुसार राज्य सरकारने ३0 सप्टेंबर २0१0 रोजी एक परिपत्रक जारी करून मालवाहतूक वाहन (ट्रान्सपोर्ट वाहन) म्हणून नोंदणी या वाहनांनी करावी, असे आदेश दिले. मात्र तेव्हापासून अशा १० हजार दुचाकींची नोंदणी झाली नसल्याचे सांगण्यात येत असून आजवर ४0 कोटींचा महसूल बुडाला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते घनश्याम मुलाणी यांनी माहिती अधिकारात उघड केली आहे. नॉन ट्रान्सपोर्ट वाहन म्हणून धावणार्या दुचाकी वाहनांवर आॅक्टोबर २0१0 पूर्वी केंद्रीय मोटार वाहन कायदा ६६ (१) आणि १९२ ‘अ’नुसार ५ हजार रुपये दंडात्मक कारवाई होत होती. आता मात्र ही कारवाई होत नसल्याचे मुलाणी यांनी सांगितले. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळेच यासंबंधी कारवाई केली जात नसावी, असे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी सांगितले.