Join us  

आयआयटी बॉम्बे देशात अव्वल, क्यूएस रँकिंगमध्ये स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 5:25 AM

क्यूएस वर्ल्ड रँकिंगच्या विषयनिहाय श्रेणीमध्ये मुंबईच्या आयआयटी बॉम्बेने संपूर्ण देशात अव्वल स्थान पटकावले आहे.

मुंबई : क्यूएस वर्ल्ड रँकिंगच्या विषयनिहाय श्रेणीमध्ये मुंबईच्या आयआयटी बॉम्बेने संपूर्ण देशात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर हा मान आयआयटी दिल्ली आणि आयआयटी खरगपूर यांना मिळाला आहे.२०२० सालची द क्यूएस वर्ल्ड इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची युनिव्हर्सिटी रँकिंग नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये २०१९ वर्षीच्या आपल्या कामगिरीत सुधारणा करत आयआयटी बॉम्बेने जागतिक क्रमवारीत ५३ वरून ४४ व्या स्थानावर झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीत विषयनिहाय श्रेणीमध्ये पहिल्या ५० मध्ये स्थान मिळविण्यात केवळ आयआयटी बॉम्बे (४४) आणि आयआयटी दिल्ली (४७) या शैक्षणिक संस्था यशस्वी होऊ शकल्या आहेत.क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीने जाहीर केलेली रँकिंग ही अधिकृत आणि प्रतिष्ठित मानली जाणारी संस्था आहे. ग्लोबली मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी ही संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने आपले स्थान पहिल्या क्रमांकावर टिकवून आहे.क्यूएसच्या या यादीत ८५ देशांमधील जगातील अव्वल १ हजार इन्स्टिट्यूट आहेत. आयआयटी बॉम्बेचा एकूण स्कोर १०० पैकी ४९.५ इतका आहे. शैक्षणिक दर्जासाठी ५४.२, आयआयटी बॉम्बेतून प्राप्त होणाऱ्या रोजगार दर्जासाठी ७१.२, तेथे शिकविणाºया फॅकल्टीसाठी ३.४, विदेशी विद्यार्थ्यांसाठी १.६ असे विविध प्रकारचे गुण आयआयटी बॉम्बेला क्यूएसकडून बहाल करण्यात आले आहेत.>आमचे विद्यार्थी आणि येथील प्राचार्य हीच आमची बलस्थाने आहेत. विद्यार्थी शिक्षकांची आणि आयआयटी बॉम्बेच्या एकूण टीमची मेहनत आणि कार्यमग्नता यामुळे आज आम्ही देशात इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये अव्वल आहोत. हेच आम्हाला भविष्यातही पुढे घेऊन जाणार असल्याचा आम्हाला विश्वास आहे.- शुभाशिष चौधरी, संचालक, आयआयटी बॉम्बे

टॅग्स :आयआयटी मुंबई