Join us  

सोशल मीडियातील असभ्यांकडे दुर्लक्ष करा - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 2:32 AM

तिवारी मारहाण प्रकरणी भाजपचा शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचे शिवसैनिकांनी मुंडण करत मारहाण केल्यानंतर राजकारण तापले आहे. भाजपने पीडित तरुणाची बाजू घेत शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. तर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मात्र शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला देत सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.

वडाळा येथील हिरामणी तिवारी या तरुणाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली. त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी तिवारीला मारहाण करीत त्याचे मुंडण केले. शिवसैनिकांच्या या कृतीवर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भाजपने तर तिवारीची बाजू घेत शिवसेनेवर गुंडगिरीचा आरोप केला. तर, सरकारविरोधी बोलणाºयाचे अमानुष मुंडण करत बेदम मारहाण केली जाते. सरकारविरोधात महिला बोलली तर त्यांना अपमानित करण्यात आले. आता या बाबी शरद पवार यांना असहिष्णुता वाटत नाहीत का, असा सवाल करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्यात हिंदू सुरक्षित आहेत का, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांना केला. शिवाय, हिंदू आणि महिलांना आता असेच अपमानास्पद वागविणार का, असा सवालही शेलार यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी मात्र या प्रकरणी शिवसैनिकांना सबुरीचा सल्ला दिला आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने करणाºयांची कमतरता नाही. महिला, मुलांबाबतही ही मंडळी असभ्य भाषेत टिपणी करीत राहतात. अशा लोकांना प्रत्युत्तर देण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचा राग मी समजू शकतो. मात्र, असभ्य पोस्ट टाकणाºयांपेक्षा आपण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ. लोकांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री आक्रमक आहेत. अशीच विधायक आक्रमकता आपण दाखवू, असे आवाहन आदित्य यांनी शिवसैनिकांना केले आहे. शिवाय, सोशल मीडियावरील या असभ्यांना देशात अशांतता माजवू इच्छिणाºया मंडळींना जनतेने नाकारल्याचे अलीकडच्या निवडणुकीतही दिसून आल्याचे सांगत आदित्य यांनी

भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात आंदोलनावरून हे सर्व प्रकरण पेटले आहे. जामिया विद्यापीठातील पोलिसांची कारवाई जालियनवाला बागेतील हिंसाचाराची आठवण करून देणारी असल्याचे विधान मुख्यमंत्री ठाकरे यांनी अलीकडेच केले होते. यावर, तिवारी याने ठाकरे यांच्यावर टीका करणारी पोस्ट फेसबुकवर टाकली. त्यावर चिडलेल्या शिवसैनिकांनी तिवारीला मारहाण केली.

टॅग्स :आदित्य ठाकरेसोशल मीडियाट्रोल