मेहनत केली तर काहीच अशक्य नाही -अनुपम खेर
By Admin | Updated: January 18, 2015 00:58 IST2015-01-18T00:58:52+5:302015-01-18T00:58:52+5:30
मी अभ्यासात हुशार नव्हतो आणि स्पोर्ट्समध्येही मला रुची नव्हती. माझ्या पीटीच्या शिक्षिका नेहमी म्हणायच्या ‘तू एकटा धावलास, तरी दुसरा नंबर येईल’.

मेहनत केली तर काहीच अशक्य नाही -अनुपम खेर
मुंबई : मी अभ्यासात हुशार नव्हतो आणि स्पोर्ट्समध्येही मला रुची नव्हती. माझ्या पीटीच्या शिक्षिका नेहमी म्हणायच्या ‘तू एकटा धावलास, तरी दुसरा नंबर येईल’. माझे वडील वन विभागात साधी क्लार्कची नोकरी करत असत. त्यावेळी मला फिल्म्स पाहायला खूप आवडायचं, कारण ती एक स्वप्नांची दुनिया होती. आणि एक दिवस मीसुद्धा मोठा होणार, असे स्वप्न कायम पाहायचो. पण स्वप्न पाहणं आणि स्ट्रगल करणं खूप कठीण असत, तो काळ भयंकर होता, असे उद्गार काढत अभिनेता अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास उलगडला.
पाचव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन यशवंत चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या सोहळ््यात अभिनेता अनुपम खेर यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले गेले. यावेळी, खेर बोलत होते. या सोहळ््याला यशवंत चव्हाण प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष अरुण गुजराथी, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, खजिनदार हेमंत टकले, सरचिटणीस शरद काळे आणि इटलीहून महोत्सवास विशेष उपस्थित असलेले दिग्दर्शक मार्को पुसीओनी उपस्थित होते.
याप्रसंगी खेर म्हणाले, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत पाऊल ठेवले त्यावेळी एका धोबीणीकडे पेईंगेस्ट म्हणून रहायचो. छोट्याशा खोलीत आम्ही चार मित्र आणि ती बाई असे मिळून दिवस काढले. पण सुदैवाने माझा पत्ता मात्र ‘अनुपम खेर, खेरवाडी, खेरनगर, वांद्रे’ असा असल्याने सगळ््यांचा गैरसमज व्हायचा. अगदी माझे वडीलही त्याला अपवाद नव्हते. त्यावेळी स्ट्रगल काळात सतत अपयश पदरी यायचे, केवळ निराशा आणि विचारांच्या गर्तेत मी बुडालेलो असायचो. त्यावेळी माझ्या वडीलांनी मला ‘भिगा हुआ आदमी बारीश से नही डरता’ हे वाक्य सांगितलं होत, ते आजही लक्षात आहे, आणि हा विचार आजही मनात रुजला आहे. मी कधीच हरलो नाही, कारण आयुष्यात ‘कुछ भी हो सकता है’ हे सत्य स्विकारलं आहे.
या सोहळ््यात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना उजाळा दिला. (प्रतिनिधी)
सेल्फी क्लिक...!
या सोहळ््यात अभिनेते अनुपम खेर यांनी शरद पवार यांच्यासोबत सेल्फी काढला. आणि ही ‘सेल्फी’ मोमेंट सुप्रिया सुळे यांनीही बाजूला उभे राहून एन्जॉय केली. छायाचित्रकार आणि उपस्थितांनी हा क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यास गर्दी केली होती.