तुम्ही वीज विकली तर ३ रु., महावितरणकडून घेतली तर १७ रुपये!
By सचिन लुंगसे | Updated: March 4, 2025 09:00 IST2025-03-04T08:59:04+5:302025-03-04T09:00:13+5:30
घरावर बसवलेला सौरऊर्जा प्रकल्प ठरणार तोट्याचा

तुम्ही वीज विकली तर ३ रु., महावितरणकडून घेतली तर १७ रुपये!
सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपण आपल्या घरगुती वापरासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारायचा. त्यातून निर्माण झालेली वीज वापरायची आणि जास्तीची वीज असेल, तर ती महावितरणला प्रतियुनिट ३ रुपयांना विकायची. मात्र, तीच वीज महावितरण आपल्याला १७ रुपये प्रतियुनिटप्रमाणे देईल. त्यामुळे घरावर बसवलेला सौरऊर्जा प्रकल्प तोट्याचा ठरणार आहे. याविषयी महावितरणशी संपर्क साधला असता, ‘आमचा प्रस्ताव सुनावणीसाठी आहे, त्यामुळे यावर आम्ही भाष्य करू शकत नाही’, असे उत्तर देण्यात आले.
घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसवलेल्या ग्राहकाचा वीज वापर १०० युनिटपेक्षा जास्त झाला, तर त्याला येणारे पाचशे रुपये बिल आता टेलिस्कोपिंग बिलिंगप्रमाणे १५०० येणार आहे. त्यामुळे ही सौरऊर्जा वापरणाऱ्या वीज ग्राहकांना मोठा शॉक बसणार आहे. महावितरणने दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या प्रस्तावातल्या मुद्द्यांवर वीज क्षेत्रातील अभ्यासक साकेत सुरी यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. महावितरणचा प्रस्ताव व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांसाठी घातक असल्याचे सुरी यांचे म्हणणे आहे.
व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रात सोलारचा वापर २४ पैकी २० तास करता येत होता. आता ८ तास याचा वापर करता येईल आणि उर्वरित १६ तास महागडी वीज घ्यावी लागेल. मुळात विजेचे सर्वात जास्त दर महाराष्ट्रात आहेत. अन्य वीज कंपन्या वीजदर कमी करत असताना, महावितरण मात्र दर वाढवत आहे. सौरऊर्जा ग्राहकांना वापरताच येणार नाही, अशी व्यवस्था महावितरणने करून ठेवल्याचे सुरी यांचे म्हणणे आहे. (पूर्वार्ध)
१२ किलोवॉटची गरज, पण...
निवासी ग्राहकाने सौर प्रकल्पाद्वारे निर्माण केलेली वीज प्रथम २४ तासांत वापरता येत होती. मात्र आता ती आठ तासच वापरावी लागेल, म्हणजे संबंधित ग्राहकाला १२ किलोवॉट विजेची गरज असताना केवळ ४ किलोवॉटचा फायदा मिळेल. उर्वरित ८ किलोवॉट वीज महावितरणला ३ रुपयांना विकावी लागेल. मात्र, हीच वीज महावितरणकडून ग्राहकांना १७ रुपयांना खरेदी करावी लागेल.
बिल जास्त येईल
एचटी वर्गवारीमधील ग्राहकांना सुरुवातीला केव्हीएच बिलिंग लागू होते. आता एलटी वर्गवारीमधील ग्राहकांनाही केव्हीएच बिलिंग लागू होईल. याचा अर्थ एपीएफसी डिव्हाइस लावावे लागेल. नाही तर युनिटी पॉवर फॅक्टर मेंटेन केला नाही, म्हणून बिल जास्त येईल.
निवासी ग्राहकांचे हाल
एखादा ग्राहक घरातून छोटा व्यवसाय करत असेल, म्हणजे ट्युशन, ब्युटी पार्लर, वकिली इत्यादी किंवा त्याने पेइंग गेस्ट ठेवला, तर ग्राहक निवासी वर्गवारीत गणला जाणार नाही. म्हणजे, त्याच्या बिलातही वाढ होईल.