आव्हान द्याल, तर हालत बिघडवू!

By Admin | Updated: August 12, 2014 23:37 IST2014-08-12T23:29:55+5:302014-08-12T23:37:56+5:30

देवेंद्र फडणवीस : अजित पवारांवर टीकास्त्र

If you challenge, do spoil the situation! | आव्हान द्याल, तर हालत बिघडवू!

आव्हान द्याल, तर हालत बिघडवू!

सांगली : गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाईचे पैसे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाच्या नावे वर्ग झाल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे अजित पवारांनी मला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा अशी हालत करू की, त्यांना तोंड दाखविणेही मुश्कील होईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिला.
वीरशैव माळी दैव समाजाचा रौप्यमहोत्सव व स्मरणिकेचे प्रकाशन फडणवीस यांच्याहस्ते मंगळवारी करण्यात आले. येथील माळी गल्लीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, गारपीटग्रस्तांसाठीची नुकसानभरपाई मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांना मिळाल्याचा आरोप मी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरोप मान्य करून मिळालेली भरपाई परत केली होती. अजित पवारांच्या आई आशाताई यांच्या नावावरील ०. ८७ हेक्टरवरील नुकसान भरपाईपोटी १३ हजार ५० रुपये आणि त्यांचे बंधू श्रीनिवास यांच्या कातेवाडी (बारामती) येथील दोन हेक्टर जमिनीतील नुकसानीपोटी ३० हजार रुपये खात्यावर वर्ग करण्यात आले. त्याचा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी मला आव्हान देऊ नये. तसे केल्यास त्यांना कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी हालत बिघडवू.
राज्यातील भामटा नेता कोण आहे, हे जनतेला माहीत आहे. सत्ता आल्यानंतर सिंचनाच्या तिजोरीतील पैसा ज्यांच्या तिजोरीत गेला, त्यांच्यावर खटले दाखल करू. त्यावेळी त्यांना पळता भुई थोडी होईल. वंचितांचे राजकारण करण्यापेक्षा वेगळेच राजकारण सध्या सुरू आहे. मी विदर्भातील असल्याने पश्चिम महाराष्ट्राला न्याय देऊ शकणार नाही, अशीही टीका पवारांनी केली आहे. विदर्भाबद्दल मला अभिमान असला तरी, राज्याच्या अन्य भागातील प्रश्नही मांडलेले आहेत. वैदर्भीय असूनही माळी समाजाने मला सांगलीत निमंत्रण दिले. कृष्णा खोरे महामंडळ स्थापन झाल्यानंतर हजारो कोटी खर्च करूनही येथील जनतेला पाणी का मिळाले नाही, याचे उत्तर पवारांनी द्यावे. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेची अशी अवस्था कुणी केली? असा सवालही त्यांनी केला.
कार्यक्रमास खासदार संजय पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, शेखर इनामदार, राजाराम गरुड, बबनराव भंडारे, गौतम पवार उपस्थित होते. समाजाचे उपाध्यक्ष रावसाहेब माळी यांनी स्वागत, डी. टी. माळी यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)

 

मदन पाटील यांची अनुपस्थिती

माळी समाजाच्या कार्यक्रमास फडणवीस यांच्याबरोबर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. काँग्रेस व भाजपचे दोन नेते एकत्रित येणार म्हणून गर्दीही झाली होती. मात्र मदन पाटील यांनी कार्यक्रमापूर्वीच संयोजकांना भेटणे पसंत केले. त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र आलेच नाहीत.

Web Title: If you challenge, do spoil the situation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.