पालकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल तर राजीनामा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:26 IST2021-02-05T04:26:51+5:302021-02-05T04:26:51+5:30

पालक संघटनांची मागणी; शिक्षणमंत्र्यांच्या घरासह, शिवसेना भवनवर माेर्चा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री असमर्थ ...

If you can't solve your parents' problems, resign | पालकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल तर राजीनामा द्या

पालकांचे प्रश्न सोडवू शकत नसाल तर राजीनामा द्या

पालक संघटनांची मागणी; शिक्षणमंत्र्यांच्या घरासह, शिवसेना भवनवर माेर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री असमर्थ असतील, पालकांच्या शिष्टमंडळाला भेटण्यासाठी त्यांना वेळ नसेल आणि मुजोर शाळांच्या शुल्कवाढीविरोधात कारवाई करू शकणार नसतील तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आक्रमक झालेल्या पालक संघटनांनी केली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील अनेक पालक व पालक संघटनांनी शनिवारी शिवसेना भवन व शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक दिली. मात्र त्यांना संबंधित भेटले नाहीत.

शुल्क अधिनियम कायद्यात आवश्यकतेनुसार बदल, शाळांचे ऑडिट, शुल्कात ३० टक्के कपात अशा प्रमुख मागण्यांसाठी पालकांनी हा मोर्चा काढला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड दिल्ली दौऱ्यावर असल्याने पालक, पालक संघटनांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. मात्र राज्याचे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जे. एम. अभ्यंकर यांची भेट घेऊन पालक प्रतिनिधींनी त्यांना निवेदन दिले. अभ्यंकर यांनी पालक संघटनांना शिक्षणमंत्र्यांशी भेट घालून देण्यात येईल तसेच या प्रश्नी लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन दिले.

तर, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई येथील पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांना ३ दिवसांची वेळ दिली असून यादरम्यान निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये पालकांकडून शुल्क घेऊ नये आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले. त्याची अनेक शाळांनी अंमलबजावणी केली नाही. ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही संपूर्ण वर्षाचे शुल्क वसूल केले. शुल्क न भरणाऱ्यांना ऑनलाइन वर्गात प्रवेश दिला नाही, परीक्षेला बसू दिले नाही. शुल्क सवलतीच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळेच मोर्चाचे आयोजन केल्याचे इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अनुभा सहाय यांनी सांगितले.

................

Web Title: If you can't solve your parents' problems, resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.