शूटिंगपेक्षा भावेशला वाचवले असते तर...

By Admin | Updated: November 30, 2015 02:10 IST2015-11-30T02:10:27+5:302015-11-30T02:10:27+5:30

प्रचंड लोंढ्यातून भावेशला त्या लोकलमध्ये प्रवेश करणेही कठीण झाले होते. तरीही, तो आतमध्ये शिरण्यासाठी सहप्रवाशांची आर्जवं करीत होता. भावेशला मृत्यू आपल्या पाठीमागे दबा धरून बसल्याची जणू

If we could save Bhavya from shooting ... | शूटिंगपेक्षा भावेशला वाचवले असते तर...

शूटिंगपेक्षा भावेशला वाचवले असते तर...

अनिकेत घमंडी,  डोंबिवली
प्रचंड लोंढ्यातून भावेशला त्या लोकलमध्ये प्रवेश करणेही कठीण झाले होते. तरीही, तो आतमध्ये शिरण्यासाठी सहप्रवाशांची आर्जवं करीत होता. भावेशला मृत्यू आपल्या पाठीमागे दबा धरून बसल्याची जणू जाणीव झाली होती. अशा वेळी त्याला आत येण्याकरिता मदत करायचे सोडून एक पाषाणहृदयी प्रवासी भावेशची मृत्यूसोबत सुरू असलेली ही झटापट मोबाइलमध्ये कैद करण्याची भावनाशून्य कृती करीत होता. भावेशचा भाऊ आणि लक्षावधी रेल्वे प्रवासी या प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
भावेशने सकाळी ८.१० वाजताची लोकल जेमतेम पकडली. फुटबोर्डवर अर्धवट लोंबकळलेल्या अवस्थेत तो होता. डोंबिवलीपाठोपाठ लोकलने कोपर स्थानक सोडले. आता लोकल वेगाने धावत होती. आपल्यापुढील प्रवाशांना तो आत येऊदेण्याची विनंती करीत होता. मात्र, फारसे कुणी काही केले नाही आणि जे होऊ नये तेच झाले. गाडीचा वेग, लोंढ्याचा आतील दबाव आणि त्यामुळे हॅडंलबारवरी ढिली होत जाणारी पकड, यामुळे भावेशचा तोल सुटला आणि तो थेट धावत्या गाडीतून बाहेर फेकला गेला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. भावेशची ही धडपड त्या गर्दीतील एक प्रवासी मोबाइलमध्ये चित्रित करीत होता. भावेश खाली कोसळताच क्लिप काढणाऱ्याने शूटिंग बंद केले. विशेष म्हणजे ही क्लिप त्याने सोशल मीडियावर टाकली. दुर्दैवी भावेशच्या मृत्यूची अशी मजा घेण्यापेक्षा ‘त्या’ने भावेशला आत घेण्यासाठी प्रयत्न केले असते तर कदाचित भावेशचा जीव वाचला असता, असे भावपूर्ण उद्गार भावेशचा मोठा भाऊ विशाल याने ‘लोकमत’शी बोलतांना काढले. एकीकडे पोटचा मुलगा गेल्याचे तीव्र दु:ख मृत भावेशच्या आईवडिलांना पचवणे कठीण होते. नुकताच सहा महिन्यांपूर्वी नोकरीला लागलेल्या अवघ्या २२ वर्षीय मुलाचा असा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला, हे सत्य असले तरी त्या घटनेमुळे ते मातापिता पुरते खचून गेलेत. कोणाला काय बोलावे, हातातोंडाशी आलेला मुलगा गेला, हे सत्य कसे मानायचे... संध्याकाळी नेहमीप्रमाणे येतो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, असे सांगून ८ च्या सुमारास घरातून गेलेल्या मुलाचा अवघ्या तासा दीड तासात अपघाती मृत्यू झाल्याची बातमी कानांवर येताच सारे काही क्षणार्धात उद्ध्वस्त झाले. आता पुढे काय? कसा झाला अपघात? आपल्याच मुलाचा का झाला अपघात? अशा असंख्य प्रश्नांनी त्यांना भंडावले आणि ते या घटनेपासून नि:शब्द झाल्याचे विशालने सांगितले.
१डोंबिवलीत सुनीलनगर, डीएनसी शाळेजवळील नवपार्वतीधाम या इमारतीत रूम नं. १८ मध्ये लक्ष्मण नकाते (वडील) वास्तव्याला आहेत. ते मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. ते सेवानिवृत्त असून त्यांना विशाल आणि भावेश ही दोन मुले होती.
२त्यापैकी विशाल हा शिक्षक असून एका नामांकित खाजगी क्लासेसमध्ये तो शिक्षक आहे. तर, भावेश याने कल्याणच्या मॉडेल महाविद्यालयातून बीएससी इन कॉम्प्युटर सायन्स ही पदवी घेतली होती.
३लॉजीस्टीकमध्ये त्याचा चांगला जम बसला होता. त्याचसंदर्भातील प्रभादेवी येथील खासगी कंपनीत तो सहा महिन्यांपूर्वी नोकरी लागला होता. स्वत:ची कंपनी काढण्याची त्याची इच्छा होती. ती अपूर्ण राहिल्याचे त्याच्या अन्य नातेवाईकांनी सांगितले.

Web Title: If we could save Bhavya from shooting ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.